डॉ. रेड्डी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : बेंगलोर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मधुसूदन तोकला याचा जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे आरोपी तोकला याचा जेलमुक्काम आणखी वाढला आहे. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. शरीरावर अनेक वार केलेल्या अवस्थेत बेंगलोर येथील डॉ. रेड्डी यांचा मृतदेह कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे 23 ऑक्टोबर 2025 रोजी सापडला होता. प्रॉपर्टीच्या वादातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. या गुन्ह्यातील अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी मधुसूदन तोकला याने जिल्हा न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. आरोपी मधुसूदन तोकला याच्या जामीन अर्जाला हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणत जामीन फेटाळण्यासाठी युक्तिवाद केला. अद्याप या गुन्ह्यात काही आरोपी हवे आहेत आणि मधुसूदन तोकला व वॉन्टेड आरोपी व्यंकटेश बाबू हे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहेत. गुन्ह्यात वापरलेल्या मयत डॉ. रेड्डी याच्या स्विफ्ट कारच्या आरशावर मधुसूदन तोकला याचे हाताचे ठसे आढळले आहेत. खून करून आरोपी व त्याचे सहकारी कणकवली-बांदा-दोडामार्ग-बेळगाव जातानाचे सीसीटीव्ही फुटेज आहे, या गुन्ह्यात अद्याप फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू असून त्यांना अटक करून त्यांच्याकडून पुरावा गोळा करायचा आहे, पूर्वनियोजित कट करून खून केलेला सदर गुन्हा अत्यंत गंभीर असून आरोपी मधुसूदन तोकला व वॉन्टेड आरोपी यांनी संगनमताने प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मयताचा अत्यंत क्रूरपणे खून केला आहे. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हान्यायालयाने आरोपी मधुसूदन तोकला याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

error: Content is protected !!