बांदा (प्रतिनिधी) : डोंगरपाल येथे श्री देवी माऊली परिवार पंचायतन देवतांची पुनःप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि धार्मिक उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शनिवार दिनांक ९ मे ते बुधवार दिनांक १३ मे या कालावधीत संपन्न होणार असून, विविध धार्मिक विधी व कार्यक्रमांची सविस्तर योजना आखण्यात आली आहे.
या सोहळ्यानिमित्त पंचक्रोशीतील भाविकांसाठी दररोज सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध पूजाविधी, होम-हवन, धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
शनिवार, ९ मे रोजी सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत पंचगव्य होम, विष्णु पूजन, गणपती पूजन, देवता प्रार्थना, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, ब्राम्हण पूजन व संबंधित कार्य. रविवार दिनांक १० मे रोजी सकाळी ७ते दुपारी १ पर्यंत गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, देवनांदी श्राद्ध, आचार्यदीवरण, मंडप प्रवेश, कौतुकबंधन, मंडप प्रतिष्ठा, देवता जलाधिवास व संबंधित विधी. सोमवार दिनांक ११ मे रोजी सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत प्राकार शुद्धी, शांतीपाठ, देवता स्नानविधी, देवता शय्याधिवास, यज्ञमंडपात देवता स्थापना, अग्नी स्थापना, ग्रहमंडल स्थापना, वास्तुपूजन, ग्रहयज्ञ विधी. मंगळवार दिनांक १२ मे रोजी सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत प्राकार शुद्धी, शांतीपाठ, आवाहित देवता पूजन, पर्याय होम व तत्त्वहोम आदी विधी.
बुधवार दिनांक १३ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून प्राकारशुद्धी, शांतीपाठ, आवाहित देवतापूजन, शिमधाडे डिंगणे, मोरगाव, आडाळी, फोंडये, नेतर्डे, कडशी-मोपा, तोरसे व डोंगरपाल गावचे मानकर, देवस्थान मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी संपन्न होणार आहेत.
सकाळी १०.१९ वा. शुभमुहूर्तवर देवतांची पुनःप्रतिष्ठापना, प्रतिष्ठा मंगलाष्टके, शांतीपाठ, प्राणप्रतिष्ठा, महापूजन, यज्ञाहुती, उत्तरांगहोम, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, अग्नीपूजन, सार्वजनिक गाऱ्हाणे, महानेवेद्य, महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होणार आहे. दुपारी २ ते ४ पर्यंत महाप्रसाद, दुपारी ४ पासून माहेरवाशीण व बाहेरील गावातील महिलांसाठी देवीची ओटी भरणे, सायं. ७ पासून गावातील महिलांसाठी ओटी भरणे, रात्री १० वाजता सुमधुर भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
या पवित्र सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान समिती, सर्व मानकरी व ग्रामस्थ यांनी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हा धार्मिक सोहळा परिसरातील श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक ठरणार असून भाविकांसाठी एक आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.












