वत्सला प्रतिष्ठानचा लोकसाहित्य पुरस्कार वितरण सोहळा १७ एप्रिल रोजी गोपुरीत

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रा.प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण

कणकवली (प्रतिनिधी) : वत्सला प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर करण्यात आलेले लोकसाहित्य संशोधन व लोकसाहित्य जतन पुरस्कारांचे दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी गोपुरी, कणकवली येथील कै. गणपतराव सावंत सभागृहामध्ये संध्याकाळी चार वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे कार्यवाह मोहन कुंभार यांनी जाहीर केले आहे. साहित्यिक अकादमी पुरस्कारप्राप्त ख्यातनाम साहित्यिक प्रा. प्रविण बांदेकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाणार आहे.

आपल्या मातोश्रींच्या स्मरण प्रित्यर्थ दर वर्षी प्रा. मोहन कुंभार हे वत्सला प्रतिष्ठानच्या वतीने द्रोपदी कुंभार लोकसाहित्य संशोधन आणि द्रोपदी कुंभार लोककला संवर्धन असे दोन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून लोककला संशोधक व लोककला संवर्धक यांना शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम प्रदान करून सन्मानित केले जाते.

शेतकरी व कष्टकरी संदर्भात महत्त्वाच्या असणाऱ्या लोककला आज बदलणाऱ्या काळामध्ये झपाट्याने लोप पावत आहे. या लोककलांचे संशोधन जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. एक काळ असा होता की या लोककला शेतकरी व कष्टकऱ्यांच्या वेदनांचे निराकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. कष्टप्रद जीवनात जाणवणारे दुःख, वेदना गायन आणि लोककलांच्या माध्यमातून निराकरण करण्यासाठी या लोककलांचा उपयोग प्रभावीपणे केला जायचा. कृषी संस्कृतीशी निगडित असणारे विविध हंगाम या लोककलांच्या माध्यमातून साजरे केले जायचे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या वाट्याला हेच एक मनोरंजनाचे साधन होते. विकासाच्या नावाखाली आज फार मोठ्या प्रमाणात शेत जमिनी कमी होत आहेत. परिणामी या सर्वांचा परिणाम भविष्यकाळामध्ये माणसाला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या तुटवड्यामध्ये रूपांतरित होणार आहे, याची जाणीव आजच्या समाजाला होणे गरजेचे आहे. या लोककलांचे दस्तऐवजीकरण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या बोलीभाषा व लोककला जनमानसामध्ये पुन्हा एकदा संशोधन आणि संवर्धनाच्या माध्यमातून टिकवण्याकडे कल असणे गरजेचे आहे. याचाच भाग म्हणून संशोधक आणि संवर्धक यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा म्हणून वत्सला प्रतिष्ठानच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात.

वर्ष २०२५-२६ चा लोककला संशोधनाचा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोहन रणसिंग यांना जाहीर करण्यात आला आहे. मोहन रणसिंग यांनी ठाकर लोककला व ठाकर बोली यांच्यावर १९७७ पासून संशोधन व लेखन करून ठाकर आदिवासी समाजामध्ये बोलली जाणारी बोलीभाषा, लोकगीते, लोकाचार, लोककला यांच्यावर संशोधन करून पुस्तक रूपाने ती संवर्धित केली आहे. मुंबईतील लोकवाङ्मय प्रकाशनाने त्यांचे हे महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजामध्ये कळसूत्री बाहुली व चित्रकथी सारख्या लोककला सामाजिक जीवनामध्ये कशा महत्त्वाच्या आहेत, याचा उहापोह या सिंधुदुर्गातील आदिवासी ठाकर या आपल्या पुस्तकात मोहन रणसिंग यांनी केला आहे.

वत्सला प्रतिष्ठानच्या वतीने ही ठाकर लोककला जतन व संवर्धनासाठी चा पुरस्कार शिवदास मसगे यांना जाहीर करण्यात आला आहे. शिवदास मसगे हे कळसूत्री बाहुली आणि चित्रकथी यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू व चित्रांची निर्मिती करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कळसुत्री बाहुली आणि चित्रकथीचे सादरीकरण करत असतात. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे ही कला हस्तांतरित करण्याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात. नव्या पिढीतून कलावंत निर्माण करण्याचाही त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. शिवदास मसगे हे पेशाने शिक्षक असून सेवेतून मिळालेल्या वेळेत ते या कलेची जोपासना करण्यासाठी उपयोग करतात.

दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी वत्सला प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनी कै. गणपतराव सावंत सभागृह, गोपुरी आश्रम, कणकवली येथे होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक वितरण केले जाणार आहे. वत्सला प्रतिष्ठान शिक्षण, साहित्य, कला व संस्कृती जतनासाठी स्थापन करण्यात आली असल्याचे प्रतिष्ठानचे कार्यवाह मोहन कुंभार यांनी प्रसिद्ध केले आहे. या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये मराठीतील नामवंत मराठी साहित्यिक व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
यावेळी बांदा कॉलेजचे प्राचार्य, बोलीभाषा व लोककला संशोधक, अभ्यासक व साहित्यिक डॉ. गोविंद काजरेकर, मराठीतील नामवंत कवी वीरधवल परब, वत्सला प्रतिष्ठानचा २०२४-२५ चा लोकसाहित्य संशोधन पुरस्कार प्राप्त, गोव्यातील लोकसाहित्य संशोधिका व साहित्यिक प्राध्यापक पौर्णिमा केरकर, गोपुरी आश्रम चे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. राजेंद्र मुंबरकर, महाराष्ट्रातील नामवंत चित्रकार नामानंद मोडक, २०२४-२५ चा लोकसाहित्य जतन पुरस्कार प्राप्त वरवडे, कणकवली येथील मालती मेस्त्री, गोव्यातील पर्यावरणवादी राजेंद्र केरकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या पुरस्कार निवड समितीतील सदस्य विनायक सापळे, ऍड. मेघना सावंत, ललित लेखिका रश्मी कशेळकर, बालसाहित्यिका व कवयित्री कल्पना मलये, विजय ठाकर, आदी मान्यवर, सिंधुदुर्ग व गोव्यातील प्रेक्षक वर्ग उपस्थित राहणार आहे. या वत्सला प्रतिष्ठान वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये महत्त्वाचे आकर्षण म्हणजे लोककला संवर्धन पुरस्कार प्राप्त शिवदास मसगे चित्रकथी लोककला सादरीकरण करणार आहेत. यावेळी सिंधुदुर्गातील काही साहित्यिकांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे कार्यवाह मोहन कुंभार यांनी कळीत केले आहे. तरी या कार्यक्रमाचा परिसरातील जास्तीत जास्त प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वत्सला प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!