कणकवली बुद्धविहार येथे धोडमिसे यांचे बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन
सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : भारताचे संविधान लिहून देशाची लोकशाही मजबूत करण्याचे अद्भुत कार्य घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता समतावादी तत्वांच्या आधारे आधुनिक भारत घडविण्यासाठी बाबासाहेबांनी आपले आयुष्य वेचले. भारतीय महिलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनीच सर्वप्रथम संविधानाच्या माध्यमातून दिला आहे. कोकण दौऱ्यावर असताना स्वतः बाबासाहेबांचे 14 मे 1938 रोजी कणकवलीत आगमन झाले होते. बाबासाहेबांचा पदस्पर्श झालेल्या कणकवली शहरातील बुद्धविहार मध्ये बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करताना मोठा आनंद होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी कणकवली बुद्धविहार येथील भिंतींवर रेखाटलेल्या महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह महामानवांच्या विचार श्रुखलांची पाहणी करत जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी कौतुक केले. यावेळी प्रांताधिकारी ॲड. जगदीश कातकर, कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे, सेवानिवृत्त सहाय्यक महसूल अधिकारी ममता तांबे, अंकुश कदम आदी उपस्थित होते.












