सिंधुदुर्गात वन्यजीव तस्करीवर एलसीबीचा मोठा धाडसी छापा

दुर्मिळ खवले मांजराची खवले आणि सांबराची शिंगे जप्त; चौघांना अटक

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दुर्मिळ खवले मांजराची खवले आणि वन्यप्राणी सांबराची दोन शिंगे रानबांबुळी अणावकरवाडी येथे जप्त केली आहेत. तब्बल ९२ लाख किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कुडाळ आणि मालवण तालुक्यातील चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता रानबांबुळी अणावकरवाडी येथे ही धडक कारवाई करण्यात आली आहे. एकूण ९२ लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एक किलो ८०० ग्रॅम वजनाची दुर्मिळ खवले मांजराची खवले आणि वन्यप्राणी सांबराची दोन शिंगे व दोन मोटार सायकल याचा समावेश आहे. गणेश प्रदीप शिर्के (वय ३०) रा. पडवे ता. कुडाळ, विठोबा भगवान बावळेकर (वय ८२) रा. रानबांबुळी ता कुडाळ, शंकर यशवंत तारापूरे (वय ३१) रा. पडवे ता कुडाळ आणि कालिदास दत्तात्रय वारंग (वय ५५) रा सुकळवाड ता. मालवण अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ४४, ४९(ब), ५१ सह बी एन एस कलम ३ (५) अंतर्गत या चारही संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल हडळ , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल डॉमिनिक डिसोजा, श्री राणे, श्री जॅक्सन, श्री कांडर, पोलिस नाईक समजिस्कर यांनी केलेली असून सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

error: Content is protected !!