वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पंचायत समितीत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. तसेच आमदार, खासदार आणि पालकमंत्री हेही सत्ताधारी पक्षाचेच आहेत. मात्र एवढी सत्ता असूनही प्रशासनावर त्यांचा कोणताही वचक राहिलेला नसल्याचे पंचायत समितीच्या अलीकडील सभांमधून स्पष्ट होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात पुढे म्हटले आहे की,पंचायत समितीच्या पहिल्या सभेला अनेक खातेप्रमुख व अधिकारी गैरहजर राहिल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश सभापतींनी दिले होते. मात्र त्यानंतरही दुसऱ्या सभेला अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. यावरून प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा वचक नसल्याचे आणि त्यांच्या आदेशाला किंमत दिली जात नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.
देशात भाजपची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत असल्याचा दावा केला जातो. मात्र वैभववाडीत प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा धाकच नसल्याने तालुक्याचा विकास कसा होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पदाधिकाऱ्यांचे प्रशासन ऐकत नसेल, तर सत्ताधारी केवळ पदे भूषवण्यासाठी आहेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तालुक्याच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व, प्रशासनावर नियंत्रण आणि जनतेच्या प्रश्नांबाबत ठाम भूमिका आवश्यक आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत तसे चित्र दिसत नसून ही बाब वैभववाडीच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

फोटो रवींद्र चव्हाण











