कणकवली (प्रतिनिधी) : दारूच्या नशेत मुलाने स्वतःच्या वडिलांना बांबूच्या काठीने मारहाण केल्याची घटना कणकवली तालुक्यातील सावडाव गावात घडली आहे. या प्रकरणी वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक विठोबा वारंग (वय ६७, रा. सावडाव गावठाणवाडी, ता. कणकवली) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा मोठा मुलगा अभिषेक (वय ३५) याला दारू पिण्याचे व्यसन आहे. लग्न झाल्यानंतरही पत्नी त्याला सोडून गेली असून तो सतत दारूच्या नशेत घरात येऊन कुटुंबियांना शिवीगाळ करत असतो.
२५ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अभिषेक दारू पिऊन घरी आला. त्यावेळी घरात वडील अशोक व आई अर्चना उपस्थित होते. जेवणासाठी चिकन घेऊन आल्यावर त्याने अचानक शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर घरातील लाकडी दांड्याने वडिलांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आई अर्चना यांनी मध्ये पडून त्यांना सोडवले.
या घटनेनंतर अभिषेकने “दोन दिवसांत तुम्हाला संपवतो” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जखमी अशोक वारंग यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून हवालदार सुधीर घारकर पुढील तपास करत आहेत.











