पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरणासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वैभववाडी रेल्वे स्टेशन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे स्थानक असून वैभववाडी, देवगड, गगनबावडा तालुका तसेच खारेपाटण परिसरातील हजारो प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी व वाहनांची ये-जा या मार्गावर होत असते. मात्र, स्थानकाकडे जाणारा रस्ता गेल्या काही वर्षांपासून नादुरुस्त असून ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत.
रस्त्याच्या खराब स्थितीमुळे प्रवासी व वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून काही ठिकाणी किरकोळ अपघातही घडले आहेत.
पावसाळ्यात या समस्येची तीव्रता अधिक वाढत असून रस्त्यावर पाणी साचल्यामुळे खड्डे लक्षात येत नाहीत, त्यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे.
तसेच, हा रस्ता स्थानकासाठी मुख्य संपर्क मार्ग असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी या कामाला प्राधान्य देऊन विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.











