वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले येथील विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशन वेंगुर्ले चा दहावा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्यपुरस्कार रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी वाशीमचे आंबेडकरी कवी महेंद्र ताजणे यांच्या खूप काही आणखी या काव्यसंग्रहाला सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक डॉ. श्रीधर पवार यांच्या हस्ते आणि विनोदिनी आत्माराम जाधव फाऊंडेशन चे संस्थापक, प्रसंवाद चे संपादक इंजि. अनिल जाधव यांच्या अध्यक्षतेखालील वेंगुर्ले येथील सातेरी मंदिर भक्तनिवास सभागृहात दुपारी 3.30 वाजता प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन नूतन मराठा हितवर्धक संघ मुंबई चे अध्यक्ष प्रवीण परशुराम परुळेकर करणार असुन फुले शाहू आंबेडकर विचारमंच वेंगुर्ले चे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, सुप्रसिद्ध कवी, कथाकार व समीक्षक सुनील कांबळे, सुप्रसिद्ध कवी व समीक्षक वीरधवल परब, संत साहित्याचे अभ्यासक देवदत्त परुळेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महेंद्र ताजणे यांची कविता काळोखाचे साम्राज्य जाळणारी असुन ते व्यवस्थांतराची भूमिका घेणारे कवी आहेत. धर्मसंस्थेच्या मुजोरी विरुद्ध त्यांची कविता आवाज उठविते. ती सांस्कृतिक संघर्षांचे मूळ शोधते. शोषणाची नवीन केंद्रे शोधुन तिच्यावर हल्लाबोल करते. जाती अंताचे समूळ निर्मुलन करुन पृथ्वीच्या पर्यावरणाला बोधिवृक्षाचा अन्वयार्थ देणारी त्यांची कविता सांविधानिक मूल्यांची पेरणी करते. ताजणे यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी असुन एक सजग कार्यकर्ता आणि संवेदनशील कवी या अत्यंत दुर्मिळ संगमाचे मिश्रण त्यांचे व्यक्तिमत्त्वात आहे. पूर्णवेळ कार्यकर्ता हा त्यांचा जैविक कोर (D.N.N.) असला तरी आंतरिक कवित्व बाळगणारे ते कवी आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्या बरोबरच कवयत्री मनीषा जाधव यांच्या ‘पुन्हा नव्याने ‘या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व सिद्धार्थ तांबे यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित नव्या जुन्या कवी-कवयित्रींचे कविसंमेलन होणार आहे. तरी या पुरस्कार वितरण समारंभास सर्व साहित्य रसिकांनी व साहित्यिक मंडळीनी उपस्थित रहावे असे आवाहन विनोदिनी आत्माराम जाधव फाऊंडेशन चे संस्थेसचिव राकेश वराडकर, अध्यक्ष सुनील जाधव व संस्थापक इंजि. अनिल जाधव यांनी केले आहे.














