मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगीवे येथे रिक्षा अपघातात रिक्षाचालक युवकाचा मृत्यू

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे येथे एक अवघड वळणावर सिद्धिविनायक हॉटेलच्या समोर रविवारी रात्री १२ वाजता च्या सुमारास रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात खारेपाटण रामेश्वर नगर येथील रिक्षा चालक युवक संदीप दिलीप पाटील वय – ४२ याचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघाताची वार्ता खारेपाटण मध्ये समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, मयत युवक संदीप पाटील हा रविवार दि.२६/४/२०२६ रोजी रात्री ११ च्या सुमारास आपल्या स्वतःच्या मालकीची असलेली रिक्षा वाहन क्र. एम एच ०७ ए एच – ५२८४ घेऊन खारेपाटण येथून तळेरे पेट्रोल पंप येथे CNG गॅस रिक्षात भरण्यासाठी गेला होता. तळेरे येथून परत खारेपाटण येथे आपल्या घरी येत असताना मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगिवे येथे एका अवघड वळणावर आला असता सदर रिक्षा चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी होऊन मोठा अपघात झाला या अपघातात रिक्षा चालक संदीप पाटील हा डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत पावला.

या घटनेची माहिती मिळताच खारेपाटण पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन जखमी संदीप याला तत्काळ जवळ असलेल्या खारेपाटण प्रा.आ.केंद्रात दाखल केले. मात्र उपचारा आधीच त्याचा अपघातस्थळी खूप रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान संदीप पाटील हा खारेपाटण मधील रिक्षा चालक रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करत होता. तर खारेपाटण रामेश्वर नगर येथे वडाच्या झाडाखाली छोटा ऑटो रिक्षा दुरुस्ती गॅरेज व्यवसाय देखील त्यांनी नुकताच सुरू केला होता. तसेच मयत संदीप याची पत्नी समृद्धी पाटील ही खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथे आशा सेविका म्हणून काम करत असून दोघ पती पत्नी छोटे मोठे काम करून आपल्या मुलांचा सांभाळ करत होते. परंतु काळाने अचानक घाला घालून संदीप याला त्याच्या कुटुंबा पासून हिरावून केल्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्ष पवन कांबळे, खारेपाटण पोलिस दुरशेत्राचे प्रमुख मिलिंद देसाई, पोलिस वाहन चालक कॉन्स्टेबल एस. डी. सावळे यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन अपघाताची पाहणी करून अपघाताचा रीतसर पंचनामा केला. तर मयत संदीप याचा मृतदेह शवविचेदन केल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले. दरम्यान मयत संदीप याच्या पाशचात पत्नी एक मुलगी १ मुलगा व दीर काकी चुलत भावंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!