आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला सन्मान
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी अशोक अर्जुन नारकर यांना आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मालवण मध्ये आविष्कार फाउंडेशन चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते मानपत्र सन्मानचिन्ह देऊन नारकर यांना सपत्नीक गौरविण्यात आले. यावेळी माजी जि. प. सभापती जयेंद्र रावराणे, शरद नारकर, आसावरी नारकर, ओम नारकर, आर्या नारकर, निधी नारकर, डॉ. शरद जाधव आदी उपस्थित होते. मालवण येथील जानकी सभागृहात आविष्कार फाउंडेशनच्या वतीने रविवार 26 एप्रिल रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी पदी कार्यरत असलेले अशोक नारकर यांनी आपल्या 30 वर्षांच्या सेवाकाळात ड्युटी अव्हर्स च्या बाहेर जाऊन रुग्णसेवा केली आहे. रात्री अपरात्री अपघाती रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ड्युटी अव्हर्स च्या चौकटीबाहेर जाऊन ऑन कॉल रुग्णसेवा नारकर करतात. आपल्या कार्यातून त्यांनी समाजासाठी, आरोग्य क्षेत्रासाठी आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. अशोक नारकर यांच्या याच समाजोपयोगी सामाजिक कार्याची दखल घेऊन आविष्कार फाउंडेशनच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार मालवण येथील जाहीर कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.











