ग्रामपंचायत पडेलच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व नृत्य प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ
पडेल (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी पडेल ग्रामपंचायतीच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. येथील श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर, पडेल येथे ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ आणि ‘नृत्य प्रशिक्षण’ कार्यशाळेचे नुकतेच उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गावचे सरपंच भुषण पोकळे अध्यक्षस्थानी होते. त्यांच्यासोबत उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, प्रमुख मार्गदर्शिका रूपाली कदम मॅडम, विद्यालयाचे मुख्याध्यापक हिराचंद तानवडे ग्रामपंचायत अधिकारी शमशुद्दीन साटविलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सरपंच भुषण पोकळे म्हणाले की, “आजच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत, यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ही कार्यशाळा केवळ अभ्यासापुरती मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही पैलू पाडणारी ठरेल. “उपक्रम या शाळेत पुढील पूर्ण शैक्षणिक वर्षात चालू राहणार आहे. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शिका ठरलेल्या रूपाली कदम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी आणि नृत्यासारख्या कला जोपासताना व्यक्तिमत्व विकास कसा होतो, यावर प्रकाश टाकला. या उद्घाटन सोहळ्याला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या या पुढाकाराचे पालक वर्गातून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठी मदत होणार असल्याचा विश्वास मुख्याध्यापक हिराचंद तानवडे यांनी व्यक्त केला.











