आचरा (प्रतिनिधी) : आचरा दशक्रोशीत हिंदू समाजात ऐक्य निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि धर्मावरील आघातांचा प्रतिकार करण्यासाठी वैशाख पौर्णिमा शुक्रवार दिनांक १ मे रोजी आचरा टेंबली येथील मांगल्य मंगल कार्यालय येथे दुपारी ३.३० वाजता ‘सकल हिंदू संमेलनाचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. ‘सकल हिंदू समाज, आचरा दशक्रोशी’ यांच्या वतीने हे संमेलन आयोजित करण्यात आले असून, यात बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्याच्या काळात देव, देश आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी हिंदू समाजाने संघटित होणे ही काळाची गरज बनली आहे. समाजापुढील विविध समस्यांचे निराकरण करणे, समाजावर होणाऱ्या आघातांना चोख प्रत्युत्तर देणे आणि एक बलशाली व समृद्ध समाज घडवणे हे या संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. एका सजग हिंदूच्या भूमिकेतून सर्वांनी या कार्यात तन, मन आणि धनाने सहभागी व्हावे, असे विनंती पत्रकात नमूद करण्यात आली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन, गणेश, इनामदार श्री देव रामेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, भारतमाता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून होणार असून गणेश स्तवन, शालेय विद्यार्थ्यांचे रामरक्षा पठण, दशक्रोशीत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी, मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक होणार आहे. हिंदू सारा एक या मंत्र, मान्यवरांचा सत्कार तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी यांचे संबोधन, डॉ. ज्योती बुवा तोरस्कर यांचे मात्रृशक्ती आणि इतिहास यावर मार्गदर्शन तसेच प्रमुख वक्ते अर्जुन चांदेरकर यांचे हिंदू समाज आणि चालीरीती या विषयी मार्गदर्शन होऊन वंदेमातरमने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या धर्मकार्यासाठी संपर्क करणाऱ्या कार्यकर्त्यांना पूर्ण सहकार्य करावे आणि या ऐतिहासिक संमेलनास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन हिंदू समाज. आचरा दशक्रोशीच्या तसेच कार्यक्रमाचे संयोजक अजित आचरेकर, संयोजक संजय मिराशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.













