अखेर खारेपाटणमधील वीजपुरवठा सुरळीत ; ग्रामस्थांना दिलासा

*पालकमंत्री नितेश राणेंचे ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख गोट्या कोळसुलकर यांनी मानले आभार*

खारेपाटण (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः जातिनिशी लक्ष घातल्यामुळे खारेपाटण गावासह परिसरातील वीजपुरवठा आता सुरळीत झाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी खऱ्या अर्थाने पालकत्व निभावत या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला अतिशीघ्रगतीने ऍक्टिव्हेट करून खारेपाटणवासीयांना दिलासा दिल्याबद्दल शिवसेना उबाठा चे कणकवली तालुकाप्रमुख महेश उर्फ गोट्या कोळसुलकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आहेत. अवकाळी पाऊस आणि वादळामुळे खारेपाटण गावासह परिसराला मोठा फटका बसून लाखोंचे नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे खारेपाटण मधील वीजवीतरणचे 33 केव्ही उपकेंद्रही बंद पडले होते. खारेपाटण गावासह परिसरातील 70 हून अधिक विजखांब जमीनदोस्त झाले होते. अवकाळी आणि वादळी पावसाचा सर्वात मोठा फटका खारेपाटण गावाला बसला होता. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते. वीजपुरवठा ठप्प झाल्यामुळे शासकीय तसेच खाजगी आरोग्य यंत्रणाही कोलमडली होती. विजपुरवठ्याभावी बँकांमधील दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले होते. बँकांमधील पॉवर बॅकअप देणारा बॅटरी बॅकअप सुद्धा चार्जिंग अभावी बंद होता. त्यातच घरातील वीजपुरवठा बंद असल्यामुळे मोबाईल चार्जिंग ची अडचण झाली होती. ऑनलाईन बँकिंग व्यवहार सुद्धा करणे मुश्किल झाले होते. याची झळ स्थानिक ग्रामस्थांसह गावी आलेल्या मुंबईकर चाकरमान्यानाही बसली होती. अचानक झालेल्या नैसर्गिक आपत्ती चा त्रास सर्वानाच सहन करावा लागला होता. अशा वेळी जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शीघ्रगतीने वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधी राजकीय पदाधिकारी मागणी करत होते. पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः लक्ष घालून लोकभावना लक्षात घेत तातडीने वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी अतिरिक्त वीज अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक खारेपाटण मध्ये तैनात करण्याच्या सूचना दिल्या होत्या.तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी चौकटीबाहेर जाऊन युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. प्रशासनानेही तातडीने कार्यवाही सुरू केली होती. खारेपाटण गावासह परिसरातील उन्मळून पडलेल्या विद्युत खांबांच्या जागी नवीन पोल बसवून विजवाहिनी जोडण्यात आल्या. अखेर आजपासून खारेपाटण विजूपकेंद्रातुन वीजपुरवठा सुरळीत झाला असून घराघरांत पूर्ववत वीजपुरवठा सुरू झाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी तात्काळ दखल घेत जातिनिशी लक्ष घालून खारेपाटण सह परिसरातील वीजपुरवठा सुरू करून जनजीवन पूर्ववत आणल्याबद्दल ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख गोट्या कोळसुलकर यांनी पालकमंत्री नितेश राणेंचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!