ओरोस (प्रतिनिधी) : एसटी मध्ये चढत असल्याचा फायदा घेऊन महिला प्रवासीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली मालवण तालुक्यातील मालोंड मलावाडी येथील किशोर दिगंबर मालोंडकर वय – ३९ वर्षे यांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्यांना एक वर्षे सहा महिने सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश १ सूर्यकांत इंदलकर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी अभियोक्ता संदीप राणे यांनी सरकारी पक्षाच्यावतीने काम पाहिले. १९ जुलै २०२५ रोजी याबाबतचा गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी ही कुडाळ एस. टी बसस्थानकावर तिचे घरी कणकवली येथे जाण्याकरिता गोवा ते कोल्हापूर जाणाऱ्या एस.टी बसमध्ये चढत असताना बसच्या दरवाजाजवळ आरोपी याने गर्दीचा फायदा घेऊन विनयभंग करण्याचे कृत्य केले होते. न्यायालयाने या प्रकरणी एकूण चार जणांची साक्ष नोंदविली. फिर्यादी, पंच भिसाजी कृष्णा माणगावकर. साक्षीदार आरती आनंद चव्हाण, तपासिक अधिकारी महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली आडकूर यांचा यात समावेश होता.











