गेली पाच दिवस वीज पुरवठा न सुरू झाल्याने ग्रामस्थ उकाड्याने झाले हैराण
खारेपाटण (प्रतिनिधी) : अवकाळी पाऊस आणि सोसाटया वारा यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण गावात झालेल्या चक्रीवादळामुळे वीज वितरण सेवेला मोठा फटका बसला असून गेली पाच दिवस खारेपाटण मधील वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने स्थानिक ग्रामस्थ अक्षरशा गर्मीने व उकाड्याने हैराण झाले आहेत.
खारेपाटण मध्ये झालेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने युद्ध पातळीवर वीज जोडणीचे काम हाती घेतले असून अपुरा कर्मचारी वर्ग व वीज मंडळाकडे असलेले कमी मनुष्यबळ याचा फटका नागरिकांना बसत असून परिणामी खारेपाटण मध्ये आज पाचव्या दिवशीही घरगुती वीज सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेली दिसत नाही.
ही परस्थिती आणखी काही दिवस अशीच सुरू राहिल्यास वीज वितरण कंपनीला नागरिकाच्या उद्रेकाला सामोरे जावे लागणार आहे.
खारेपाटण येथे झालेल्या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी विद्युत पोल मोडून पडले असून वीज वाहिन्या रस्त्यावर पडलेल्या आहेत.तीन दिवसानंतर खारेपाटण बाजारपेठ मधील काही भाग तर रामेश्वर नगर,बंदरवाडी कोंडवाडी हसोळ टेंब,राऊतवाडी,कालभैरव वाडी,कपिलेश्वरवाडी माचाळवाडी, टाकेवाडी,काझीवाडी आदी भागातील वीज पुरवठा सुरू करण्यात आला असून अजून ४० टक्के भागातील वीज पुरवठा खंडित असून खारेपाटण पंचशील नगर,कर्लेवाडी,गुरववाडी,संभाजी नगर भागातील वीज पुरवठा अजून देखील सुरू झालेला नसून येथील नागरिकांना मेणबत्ती व दिवाबत्ती वर रात्र काढाव्या लागत आहे.
गेली पाच दिवस होऊन सुद्धा खारेपाटण मध्ये वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने याचा जास्त फटका लहान बालके ज्येष्ठ नागरिक आजारी माणसे यांना बसत असून घरातील वीज उपकरणे बंद असल्याने प्रचंड उष्मा घाताने नागरिक हैराण झाले आहेत.त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. खारेपाटण पंचशील नगर येथील चक्रीवादळात पडलेले वीज पोल अद्याप उभे केलेले नाहीत त्यामुळे वीज पुरवठा खंडित असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.











