काळसे हायस्कूलच्या 1985 – 86 बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

शालेय आठवणींना उजाळा देण्याबरोबरच प्रशालेला दिली आर्थिक व वस्तुरूपी मदत

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे गावच्या श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे या प्रशालेच्या सन 1985 – 86 च्या एस. एस. सी. बॅचच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी तब्बल 40 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र येत काळसे ब्राम्हणदेव येथे गेट टुगेदर साजरे केले आणि शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. या सोबतच फक्त मौजमजा न करता ज्या शाळेत आपण शिकलो आणि भावी आयुष्यात विविध क्षेत्रात यशस्वी झालो. त्या शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त करून प्रशालेला भरघोस आर्थिक मदत तसेच वस्तुरूपी देणगीही यावेळी काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनोद गोसावी आणि मुख्याध्यापक अविनाश परब यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी माजी विद्यार्थी डॉ. शरदचंद्र काळसेकर यांच्या नेतृत्वात 1985 – 86 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सढळ हस्ते देणगी देऊन तब्बल 80 हजार रुपये जमा केले. त्यातून एक एल. सी. डी. टीव्ही वस्तुरूपात आणि उर्वरित 60 हजार रुपये एवढी रक्कम धनादेश स्वरूपात प्रशालेला मदत म्हणून अध्यक्ष विनोद गोसावी यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी सन 1985 – 86 बॅचचे शरदचंद्र काळसेकर, राम परब, श्याम मालवणकर, विनोद नार्वेकर, राजेंद्र मयेकर, नारायण मयेकर, सुगंधा कुलकर्णी, माधुरी धामापूरकर, विष्णू पारकर, भगवान पारकर, परशुराम गुराम, सीमा गावडे, शशिप्रभा माडये, छाया नार्वेकर, लक्ष्मण सावंत, प्रमोद चिंदरकर अजित केळजी, मंगेश केळजी, संजय खोत, संतोष खोत, गिरीश प्रभु, रविंद्र परब, मनोहर काळसेकर, राजेंद्र गोसावी हे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

तत्पूर्वी सर्व माजी विद्यार्थ्यांनी काळसे हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका, श्रीमती परुळेकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या गेट टुगेदर कार्यक्रमात सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला आणि हा स्नेहमेळावा अतिशय उत्साहात साजरा झाला. तसेच यावेळी उपस्थित संस्था अध्यक्ष विनोद गोसावी यांनी प्रशालेला बहुमोल देणगी दिल्याबद्दल 1985 – 86 बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे संस्था आणि प्रशालेच्या वतीने आभार व्यक्त केले व या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपकडून प्रेरणा घेऊन इतर बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनीही अशाच प्रकारचे गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित करून संस्थेला आर्थिक मदत मिळवून दयावी आणि सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन प्रशालेच्या इतर माजी विद्यार्थ्यांना केले.

error: Content is protected !!