वैभववाडी (प्रतिनिधी) : आंघोळीसाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा करूळ जामदारवाडी येथील धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तन्वी आनंद माळकर (वय 16 ) रा. करूळ भोईडेवाडी, स्वरा संदीप सुर्वे वय 11 मुळगाव कुसुर सध्या राहणार मुंबई, ऋतिका संतोष पाटील वय 18 रा. करूळ भोयडेवाडी सध्या रा. मुंबई असे मयत झालेल्या या तीन मुलींची नावे आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
करूळ भोईडेवाडी येथील विलास काशीराम वारंग यांच्या आईचे बारावे कार्य होते. हे कार्य करून त्यांचा मुलगा करण वारंग, ऋतिका विलास वारंग, यांच्या बहिणीची मुलगी स्वरा सुर्वे, जाग्रवी सुर्वे व त्यांच्या वाडीतील विलास संतोष पाटील ही सात मुले करूळ जामदारवाडी येथील धरणात आंघोळीसाठी गेली होती. तर विलास वारंग धरणानजीक असलेल्या केदारलिंग मंदिरात देवाला नारळ अर्पण करण्यासाठी गेले होते. आंघोळीला गेलेल्या मुलांपैकी मयत तन्वी माळकर, स्वरा सुर्वे व कृतिका पाटील या धरणातील खोल पाण्यात गेल्या. तत्पूर्वी त्यांनी एकत्रित फोटोही काढून घेतले. त्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या पाण्यात बुडू लागल्या. सोबत असलेल्या मुलांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत त्या खोल पाण्यात बुडाल्या.सोबतच्या मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर खाली मंदिरात असलेले विलास वारंग हे धावत धरणाच्या दिशेने आले. तर यापैकी एका मुलाने घटनेची माहिती घरी फोन करून दिल्यामुळे वाडीतील ग्रामस्थांनी धरणाकडे धाव घेतली. करूळ बौद्धवाडी येथील यश देवेंद्र पवार,आकाश सुर्वे, विलास काशीराम वारंग, सुशील रामकृष्ण माळकर, संजय रामकृष्ण वारंग,संजय हरिश्चंद्र वारंग,बाळकृष्ण वारंग यांनी धरणात उतरून त्या बुडालेल्या तिन्ही मुलींना बाहेर काढले मात्र बाहेर काढण्यापूर्वीच त्या मयत झाल्या होत्या. घटनेची माहिती वैभववाडी पोलिसांना मिळतात वैभवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर नायब तहसीलदार दिलीप पाटील यांच्या टीमनेही घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान तीन मुली धरणात बुडाल्याची माहिती मिळताच मयत मुलींच्या नातेवाईकांनी व करूळ ग्रामस्थांनी धरणाकडे धाव घेतली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांनी गर्दी केली होती.तर नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
पोलिसांनी मृत मुलींचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे शिवविच्छेदनासाठी आणण्यात आले. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली.
स्वरा संदीप सुर्वे ही अकरा वर्षाची मुलगी आपल्या मोठ्या बहिणी व आईसह मुंबई वरून करून भोईरवाडी येथे आपल्या आजीच्या कार्यासाठी आली होती आजीच्या कार्यासाठी आलेल्या नातीचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तीची मोठी बहीण मात्र या तुन वाचली आहे. तर मयत तन्वी आनंद माळकर ही यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली होती. तर ऋतिका संतोष पाटील ही नुकतीच मुंबई येथे खाजगी नोकरीस लागली होती.










