जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी गुन्हा दाखल केला .
कणकवली (प्रतिनिधी) : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांना कणकवली वागदे येथे दिलीप दत्ताराम ताटे हे आपल्या राहत्या घरी अंगात अलौकिक शक्तीचा संचार होत असल्याचे भासवून तसेच तांत्रिक, मांत्रिक, वशीकरण विद्या, अघोरी विद्या अवगत असल्याचे भासवून अनेकांची फसवणूक करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करावी म्हणून सोबत सहसंघटिका उज्वला येळावीकर यांना घेऊन त्यांच्या घरी गेले .तेथे त्यांना काही समस्या विचारल्या .आपल्या कुटुंबामध्ये पिढ्यान पिढ्या पासून अंगात भवानी देवीचे वारे येते.पणजोबा, आजोबा आणि वडिलांनंतर ते माझ्या अंगात यायला लागले. माझ्या अंगात पंधरा ते वीस वर्षापासून हे वारे सूत्र येत असून ते वारेसूत्र मला अनेक भाविकांच्या काय समस्या आहेत त्या सांगते .त्यावर उपायही सुचविते. तसेच मला अलौकिक विद्या प्राप्त असून तांत्रिक, मांत्रिक, अघोरी विद्या, तसेच वशीकरण विद्या प्राप्त असून मी क्षणात भूत उतरवितो. लांब लांबच्या गावी जाऊन मी तीन मिनिटात भूते उतरविली आहेत .
भूतांना शनिवारी माझ्या घरी अघोरी कृत्य करून जाळून कायमची मुक्ती देतो असे सांगितले. चिमटीत गहू घेऊन पाटावर टाकताच त्याला दिव्य शक्ती प्राप्त होते आणि सर्व समस्येचे कारण त्याला समजते.असा दावा करताच आपल्या मुलाला पाचसहा वर्ष झाली तरी मूळ बाळ होत नसल्याचे कारण विचारताच त्याने पाटावर गहू टाकून सुनेवर दोन प्रेतात्मा असून त्यांना मी येथे जादूटोणा आणि अघोरी कृत्य आणि मंत्राच्या सहाय्याने जाळून टाकेन . त्या साठी पाच हजार रुपये खर्च येईल असे सांगितिले .
पती पत्नीच्या आमच्या नात्यात दुरावा निर्माण झालाय त्याचे कारण विचारताच मी वशीकरण यंत्र देतो तो पाण्यात ठेवून ते पाणी प्यायला पत्नीला द्या .तसेच मी तावीज मंत्रवून देतो तो दंडात बांधा. पत्नी पंचवीस वयाच्या तरुणी सारखी जवळ येईल . त्या तावीजचे पंधराशे रुपये मागितले. आपला मूलगा हयात नाही,आपल्या पती पत्नीत कोणताही दुरावा नाही हे त्याला दिव्य शक्तीने ओळखता आले नाही. हे लक्षात येताच तुमच्या अंगात अलौकिक शक्तीचा संचार होईल त्या दिवशी येतो असे सांगून तेथून निघून गेले .
त्यानंतर त्याचा दिव्य दरबार गुरुवारी भरतो व त्याच्या अंगात अलौकिक शक्तीच्या संचार होतो त्या दिवशी सोबत अध्यक्ष राजीव बिले, सचिव अजित कानशिडे ,महिला संघटिका उज्वला येळावीकर, स्नेहा महाडिक, शिवेंद्रकुमार महाडिक, आणि अतुल दळवी यांना घेऊन गेले . त्यावेळी त्यांच्या अंगात अलौकिक शक्तीचा संचार झाल्यावर पुन्हा तोच प्रश्न विचारला. त्यावेळी हि त्याने सुनेवर दोन प्रेतात्मा आहेत . त्यांना अघोरी विद्येने जाळून टाकेन . उज्वला येळावीकर यांच्या मुलीचे लग्न ठरले आणि घरात दागिण्यांची चोरी झाली असे विचारताच नवऱ्या मुलाने दागिणे चोरून नेले असून मी त्याच्यावर येथून करणी करतो जाप घालतो . तो सात दिवसात वेडापिसा होऊन दागिने आणून देईल असे सांगितले . स्नेहा महाडिक यांनी आपली सून रात्री मुलांसोबत न झोपता घाबरून माझ्या कडे झोपायला येते असे का करते विचारले असता सूनेवर समंध बाधा असून मुलावर सैतानाचा वास आहे . त्यामुळे ती दोघे एकत्र येत नाहीत आणि त्यांना मूल होत नाही .सुनेच्या छातीवर गाठ असल्याने ती नवऱ्याला हात लावू देत नाही . ती गाठ मी येथे जादूटोणा करून जाळून टाकेन . दवाखान्यात आजारी एखादा असेल आणि तो येऊ शकत नसेल तर मी येथून मंत्राने उपचार सुरू करतो व तो खडखडीत बरा होऊन घरी जातो असाही दावा केला . तोपर्यंत सुनेला आराम पडण्यासाठी पाण्यातून गोमूत्र प्यायला द्या . तीच्या वेदना कमी होतील . हि भूते उतरविण्यासाठी बारा हजाराचा खर्च सांगितला .
बिले सरांच्या मुलालाही तीन भूते असून ती मी येथून नष्ट करणार . त्यालाही बारा हजाराचा खर्च सांगितला . उज्वला येळावीकर यांनी दुसरी लग्न झालेली मूलगी त्याच्या पतीने तिला घरी आणून सोडली त्यावर उपाय विचारले असता मी मंत्रवून वस्तू देती ती मुलीच्या जवळ ठेवा . त्याला बारा हजार खर्च आहे व जावयाच्या दंडावर बांधायला तावीज देतो त्याला पंधराशे खर्च आहे . हे केल्यावर दोन्ही उभयता एकत्र येतील
वशीवरणाचा तावीज दंडावर बांधताच पत्नी कडे जावई आकर्षित होईल असा हि उपाय सांगितला .
जादूटोणा आणि अघोरी कृत्यासाठी लागणारे साहित्य अयोद्यावरून आणावे लागणार आहे . त्यासाठी निम्या निम्या रक्कमेची मागणी केली . तसेच चौकेकर यांच्या मुलाला तसेच महाडिक यांच्या मुलालाही माझ्या अलौकिक शक्तीने मूल प्राप्त करून देण्याचा दावाही केला .
दिलीप ताटे सांगत असलेल्या समस्या ह्या जादूटोणा विरोधी कायदयानुसार अनेक कलमांचे उल्लेखन करीत होता .तसेच स्वतःकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना आजारावर उपायही सूचवून औषधे ही सांगत होता . सदरचा गुन्हा ड्रग्ज अँड मॅझिक रेमिडिज ॲक्ट १९५४ अन्वये गुन्हा ठरत होता. त्याच्या अलौकिक शक्तीची अजून चाचपणी करण्यासाठी अंगात आलेल्या अलौकिक शक्तीला अतुल दळवी यांनी देवा हे मला काही पटत नाही . मला पटेल असे सांग . असे म्हणताच अंगातील अलौकिक शक्तीने लेकरा विचार तुला काय विचारायचे ते . असे आवाहन करताच अतूल दळवी यांनी मी ज्या मोटर सायकलने आता आलोय ती तुमच्या दारात दहा बारा फुटावर उभी आहे . त्याचा नंबर फक्त ओळखून सांगा .असे विचारताच अलौकिक शक्ती प्रचंड खवळली व रागा रागाने मोठ्या आवाजात बोलू लागली . मी तांत्रिक, मांत्रिक, वेताळ ,भूत नाही तुझ्या गाडीचा नंबर सांगायला मी तुला बोलविले नव्हते . तुझी भक्ती आणि श्रद्धा असेल तर थांब असे सांगून त्यानंतर अंगातील संचार निघून गेला .
दिलीप ताटे करीत असलेले दावे आणि लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हजारो रुपये लुटत असल्याचे लक्षात येताच त्याच्यावर पोलिस ठाणे कणकवली येथे जादूटोणा विरोधी कायदा २०१३ आणि ड्रग्ज अँड मॅझिक रेमिडिज ॲक्ट १९५४ अन्वये रितसर गुन्हा दाखल केला . पोलिस उपनिरीक्षक पन्हाळे साहेब या बाबतचा पुढील तपास करीत आहेत .











