बुद्धविहाराचा “४ था” वर्धापन दीन उस्ताहात साजरा
“बुद्धविहारे ही सामाजिक धार्मिक सांस्कृतिक चळवळीची केंद्रे बनली पाहिजे…”
खारेपाटण (प्रतिनिधी) : महामानवांच्या जयंती साजऱ्या करत असतानाच प्रत्येकाने त्यांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज असूनसमाजातील बांधवांनी नुसती बुद्धविहारे उभी करून चालणार नाहीत तर त्याचे पावित्र्य राखण्या बरोबरच त्यांचे योग्यरित्या जतन होणे अतिशय महत्वाचे असून बुद्धविहारे ही सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक चळवळीची केंद्रे बनली पाहिजेत असे भावपूर्ण उदगार सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी खारेपाटण पंचशील नगर येथे बुद्धविहाराच्या चौथ्या वर्धापन दीन कार्यक्रमानित आयोजित करण्यात आलेल्या महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमात मार्गदर्शन करताना काढले.
पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१६ मे २०२६ रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य म. ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छ. शाहू महाराज व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा संयुक्त जयंती महोत्सव व खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहाराचा ४ था वर्धापन दिन कार्यक्रम नुकताच स्थानिक मंडळाचे अध्यक्ष भरत रघुनाथ पाटणकर यांच्या अध्यक्षते खाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प.पूज्य भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष जगदीश पाटणकर, खजिनदार दिनेश पाटणकर, विशाल पाटणकर, हेमंत पाटणकर, विजय पाटणकर, ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर, प्रकाश पाटणकर सर संघमित्रा महिला मंडळ अध्यक्षा – संकिता पाटणकर, सचिव -आस्था पाटणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात पंचशील ध्वजारोहण करून करण्यात आली. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला मुंबई मंडळाचे अध्यक्ष जगदीश पाटणकर व खजिनदार दिनेश पाटणकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर संयुक्त जयंतीच्या निमित्ताने महामानवांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बौद्धचार्य संतोष मधुकर पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली खारेपाटण बुद्धविहार येथे सामुदायिक बौद्ध पूजा पाठ व त्रिसरण पंचशील घेण्यात आले. यामध्ये सर्व धम्म बंधू भगिनीनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खारेपाटण बुद्धविहार येथे घेण्यात आलेल्या अभिवादन सभेत जगदीश पाटणकर, विशाल पाटणकर, मधुकर पाटणकर, संकिता पाटणकर, संतोष पाटणकर, संतोष तुरळकर, भरत पाटणकर यांनी सहभाग घेत आपले विचार व्यक्त केले. व बुद्धविहाराच्या वर्धापन दिनास शुभेच्छा दिल्या. तर यावेळी मुलांसाठी व महिलांसाठी विविध फनी गेम घेण्यात आले. यावेळी संघिमत्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा संकिता पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली महिलांसाठी भव्य लकी ड्रॉ चा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये पंचशील नगरातील सर्व महिलांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता. तर सहभागी महिलाना ड्रॉ. च्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला मंडळाच्या कार्यकर्त्या आस्था पाटणकर यांनी केले. रात्री पंचशील नगर येथील मुलांच्या व महिलांच्या विविध गुणदर्शन कला संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मंडळाचे सचिव सागर पोमेडकर यांनी केले.














