शाहूपुरी पोलीस ठाण्यात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी) : ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सी. पी. आर. रुग्णालय व सेवा रुग्णालय कसबा बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने मौखिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक (प्रभारी) डॉ. सरिता थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा सल्लागार (NTCP) डॉ. व्ही. ए. आरळेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी दंत शल्य चिकित्सक डॉ. अर्चना पाटील उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा सल्लागार डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तंबाखू सेवनामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम, कर्करोगासारखे गंभीर आजार तसेच कोटपा ॲक्ट (COTPA Act 2003 ) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य व पोलीस विभागांनी संयुक्तपणे कार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. दंत चिकित्सक डॉ. अर्चना पाटील यांनी मौखिक आरोग्याविषयी मार्गदर्शन करून नियमित दंत व मौखिक तपासणी करण्याचे आवाहन केले. या मौखिक आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला.









