ओरस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील स्थानिक कौशल्याला डिजिटल माध्यमातून नवी ओळख मिळवून देण्यासाठी “सहोदर” या अभिनव मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. “माणसाक काम आणि कामाक माणूस” हे घोषवाक्य घेऊन सुरू करण्यात आलेले हे अॅप स्थानिक कामगार, सेवा पुरवठादार आणि ग्राहक यांना एकाच व्यासपीठावर जोडणारा रोजगाराचा सक्षम सेतू ठरत आहे.सिंधुदुर्गच्या भूमीत असलेल्या कष्टाळू हातांना आणि विविध कामांच्या संधींना जोडणारे आधुनिक डिजिटल व्यासपीठ म्हणून “सहोदर अॅप” पुढे येत आहे. रोजगाराच्या शोधात असलेले युवक, कुशल कामगार, लघुउद्योजक तसेच सेवा शोधणारे नागरिक यांच्यासाठी हे अॅप उपयुक्त ठरणार आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना योग्य व्यक्ती सहज शोधता येणार असून काम देणारा आणि काम शोधणारा यांच्यात थेट संपर्क निर्माण होणार आहे. त्यामुळे मध्यस्थांची गरज कमी होऊन पारदर्शक, विश्वासार्ह आणि जलद सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. स्थानिक रोजगाराला चालना देतानाच सिंधुदुर्गातील मनुष्यबळाचा योग्य उपयोग करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे दिसून येते. “सहोदर” अॅपमध्ये विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्लंबिंग, पेंटर, गार्डनिंग व आऊटडोअर सर्व्हिसेस, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल कामे, सुतारकाम, संगणक व लॅपटॉप रिपेअरिंग, टिफिन सेवा, डिलिव्हरी सेवा, ऑटो-रिक्षा सेवा, इंटेरियर डिझाईन, व्हिडिओग्राफी सेवा तसेच पूजा-विधीसाठी पुजारी सेवा अशा अनेक सेवा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे सेवा देणाऱ्यांसाठी आणि सेवा घेणाऱ्यांसाठी स्वतंत्र नोंदणी आणि लॉगिनची सुविधा देण्यात आली आहे. सेवा पुरवठादारांना स्वतःची सेवा नोंदवता येणार असून ग्राहकांना आपल्या गरजेनुसार योग्य सेवा शोधणे सोपे होणार आहे.डिजिटल युगात स्थानिक रोजगार आणि सेवा क्षेत्राला नवे व्यासपीठ मिळवून देण्याचा हा प्रयत्न महत्त्वपूर्ण मानला जात आहे. विशेषतः बेरोजगार युवक, छोटे व्यावसायिक आणि कौशल्याधारित सेवा देणाऱ्यांसाठी “सहोदर” हे अॅप रोजगारनिर्मितीचे प्रभावी माध्यम ठरू शकते. “विश्वासाचा सेतू, संधींचा विस्तार आणि प्रगतीचा मार्ग” या ध्येयवाक्याला साजेसा हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी नवे दालन उघडणारा ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.कोट सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा पुरवठादार कमी आहेत. असलेतर ते शहरी भागात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात एखादी सेवा आवश्यक असल्यास ती मिळत नाही. ही गरज ओळखून वन रेबर सॉफ्टवेअर या संस्थेच्या माध्यमातून सहोदर अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये रजिस्टर झाल्यावर ३५० एवढ्या सेवा उपलब्ध होणार आहेत. आठ दिवसांपूर्वी हे अॅप कार्यरत करण्यात आले आहेत. आतापर्यंत ४५० जणांनी आपली नोंदणी केली आहे. त्यामध्ये २२६ विविध सेवा पुरविणाऱ्या पुरवठादारांचा समावेश आहे.
“सहोदर” अॅपमुळे स्थानिक रोजगाराला नवी दिशा; कामगार आणि ग्राहकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा उपक्रम









