विविध विषयांवरील कवितांमुळे वाचकांमधील औत्सुक्य सतत ताजे ठेवणारा ‘मैफील’ हा काव्यसंग्रह- लेखिका वृंदा कांबळी

लेखक, अभिनेता विठ्ठल काळे यांच्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया व्यासपीठाच्या माध्यमातून अजिंक्य जाधव यांच्या ‘मैफिल’ या काव्यसंग्रहाचे झाले प्रकाशन

प्रत्येक कविने, लेखकाने किमान एक तरी वाचक निर्माण करणे गरजेचे- अजिंक्य जाधव

वैभववाडी (प्रतिनिधी) : लेखक कवींनी लिहिते झाले पाहिजे तसेच समाजातील वास्तव त्यांच्या कवितेमधून डोकावले पाहिजे. सध्या लेखक कविंमध्ये एक भीतीचे वातावरण दिसत आहे. परंतु हे सर्व झिडकारून देणे गरजेचे आहे. आजच्या ऑनलाईन युगात आपण जी अभिजात भाषा जपण्याचा प्रयत्न करीत आहोत त्याची बरीच जबाबदारी लेखक कवी आणि वाचकांवर आहे हे विसरून चालणार नाही. प्रत्येक कविने लेखकाने किमान एक तरी वाचक निर्माण करणे गरजेचे आहे. या उदात्त हेतूने तसेच नवकवींना लिहिते करण्यासाठी मार्गदर्शन आणि एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने अजिंक्य जाधव यांनी अनेक नव्या जुन्या कविंना त्यांच्या कवितांच्या माध्यमातून एकत्रित आणून अनुराधा प्रकाशनाच्या सहकार्याने ‘मैफिल’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाची निर्मिती केली आहे.

लेखक व अभिनेते विठ्ठल नागनाथ काळे यांनी सोमवार दि. १ जून २०२६ रोजी आपल्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया व्यासपीठाच्या माध्यमातून या काव्यसंग्रहाचे प्रकाशन केले. प्रेम, विरह, निसर्ग, आत्मसंवाद, सामाजिक जाण, जीवनातील क्षणभंगुरता अशा विविध विषयांचा सुंदर समतोल या काव्यसंग्रहात साधला गेला आहे. या काव्यसंग्रहातील कवितांना कुठल्याही एका विषयाचे बंधन नसल्यामुळे अगदी काव्यसंग्रहात त्या नावाप्रमाणेच एका सुरेख मैफिलीचा अनुभव वाचकांना येईल असे मत संकलक व संपादक अजिंक्य जाधव यांनी व्यक्त केले. अजिंक्य जाधव यांनी काढलेल्या ‘मैफिल’ या पहिल्याच प्रातिनिधिक काव्यसंग्रहाला लोकप्रिय मराठी लेखिका काजल कामीरे यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत तर सदर काव्यसंग्रहात तोचतोचपणा नसल्यामुळे पुढील कवितेत काय असेल याचे औत्सुक्य सतत ताजे ठेवणारा असा हा काव्यसंग्रह प्रत्येक काव्यप्रेमींनी वाचावा असे आवाहन लेखिका वृंदा कांबळी यांनी केले आहे. सदर चा काव्यसंग्रह ebook shopizen website आणि मुद्रित प्रति मध्ये सुद्धा उपलब्ध असल्याची माहिती संकलक व संपादक अजिंक्य जाधव यांनी दिली आहे. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ रोहन नेरुरकर यांनी केले असून अक्षर जुळणी रुपेश मेस्त्री यांची आहे. सदर काव्यसंग्रहात एकूण ४९ कवी असून त्यांच्या ५८ कविता या काव्यसंग्रहात आपल्याला पहायला मिळतील.डॉ.प्रणव प्रभू, सिद्धी महाजन, विजय मरळकर, किशोर नाईक, सदानंद जांभवडेकर, सुजित कदम, सुरज घोणे यांचे मार्गदर्शन व विशेष सहकार्य या काव्यसंग्रहास लाभले आहे.

error: Content is protected !!