आमदार होण्यास महत्वाची भूमिका बजावणारे पालकमंत्री नितेश राणेंचे अबिद नाईक यांनी केले जल्लोषी स्वागत
कणकवली (प्रतिनिधी) : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्री. अनिकेतभाई तटकरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.फॉर्म मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विरोधी पक्षाचे उमेदवार श्री. बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने श्री. तटकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे,राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.नितेश राणे यांच्यावर विश्वास ठेवत श्री. बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.या संपूर्ण घडामोडीत पालकमंत्री नितेश राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने त्यांच्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
याच पार्श्वभूमीवर कणकवली येथील नीलम कंट्रीसाईड येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन तसेच फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत आणि आभार व्यक्त केले.तसेच यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित असलेल्या श्री.बाळ माने यांचेही आभार मानण्यात आले.
महायुतीच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत घेतलेल्या या निर्णयामुळे विधानपरिषद निवडणुकीत बिनविरोध विजयाची नोंद झाली असून, हा महायुतीच्या एकजुटीचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा विजय असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष श्री.सुभाष सावंत,प्रांतिक सदस्य श्री.विलास गावकर,कणकवली शहराध्यक्ष श्री.इम्रान शेख,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर, जिल्हा सचिव श्री.सतीश पाताडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












