कणकवली (प्रतिनिधी) : पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य जैवविविधता महामंडळ व सावंतवाडी वनविभाग यांचे संयुक्त विद्यमाने एक ते पाच जून हा कालावधीत “पर्यावरण दिन सप्ताह” म्हणून साजरा करण्यात आला. उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिश शर्मा व सहायक वनसंरक्षक सावंतवाडी (खा.कु.तो.) डॉ. सुनील लाड व वनपरिक्षेत्र अधिकारी कणकवली सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कणकवली नियतक्षेत्र” जागतिक पर्यावरण दिन सप्ताह” साजरा करण्यातआला. त्यानुसार दिनांक 1/6/ 2026 रोजी घोणसरी नियत क्षेत्रात सर्व वन कर्मचारी यांनी निसर्ग भ्रमंती करून जंगलातील औषधी वनस्पती आणि जैवविविधता याबाबत प्रवीण सावंत यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त केले. दिनांक 2/ 6/ 2026 रोजी केदारलिंग मंदिर करूळ या ठिकाणच्या देवराई परिसराची साफसफाई करून देवराई संवर्धनाचे जैवविविधतेतील महत्व विशद करण्यात आले दिनांक 3/ 6 /2026 रोजी देवगड मीठमुंबरी येथे समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली व कांदळवनांचे मानवाच्या जीवनातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दिनांक 4/ 6/ 2019 रोजी कुंभवडे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित ग्रामस्थांना जैव विविधतेबाबत मार्गदर्शन करून वृक्षारोपण करून वृक्ष लागवडीचा संदेश देण्यात आला. दिनांक 5/6/2026 रोजी नरडवे मधील परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी विविध स्थानिक वृक्षप्रजातींच्या रोपांची लागवड करून स्थानिक जैवविविधता संरक्षण व संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कणकवली सुहास पाटील यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि वृक्षसंवर्धनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले….. सदरचा सप्ताह वनपाल देवगड श्रीकृष्ण परीट,वनपाल फोंडा सारीक फकीर, वनपाल दिगवळे सदाशिव वागरे, वनपाल भिरवंडे कुसुम कांबळे, वनपाल वैभववाडी सुरेश पटकारे, सन्माननीय पदाधिकारी सरपंच ग्रामस्थ आणि वनक्षेत्रातील सर्व वनरक्षक यांचे उपस्थितीत साजरा करण्यात आला.













