पर्यावरण रक्षणासाठी तरुणाई सज्ज; मेगल यांचा प्रेरणादायी संवाद

अनुभव शिक्षा केंद्र व साद टीमच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण विषयक ऑनलाइन चर्चासत्र संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आजचा तरुण आणि पर्यावरण’ या विषयावर ऑनलाइन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात युथ बिट्स फॉर क्लायमेट च्या संस्थापक मेगल यांनी संवाद साधला. या चर्चासत्राला सिंधुदुर्ग जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आजचा तरुण आणि त्यासमोरील पर्यावरणीय समस्या याविषयी मेगल यांनी आपल्या युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या आणि भविष्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. विविध माध्यमातून मेगल पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचे काम करत असतात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी यासाठी राबविण्यात येणारा निसर्गशाळा हा उपक्रम, कोकणची लोककला दशावतार चा पर्यावरण जनजागृती साठी केलेला वापर, विविध क्षेत्र भेट, प्राणी-पक्षांचे केलेले रेस्क्यू ऑपरेशन यासारख्या विविध कार्यक्रमांची मेगल यांनी माहिती दिली. विविध आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेल्या मेगल यांनी आपल्या या सर्व उपक्रमांत तरुणाईचा सहभाग लक्षणीय असल्याचे नमूद केले.

चर्चासत्रात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा महत्त्वपूर्ण सहभाग लाभला. घुंगुरकाठी सिंधुदुर्ग चे अध्यक्ष आणि कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी यावेळी नव्या पिढीशी नाळ जोडून ठेवण्यासाठी शाळांमध्ये पर्यावरण प्रबोधनासारखे उपक्रम राबविणे, पालकांचा आणि खासकरून स्त्री वर्गाचा सहभाग वाढविणे, प्लास्टिक च्या पर्यायी साधनांचा वापर करणे यासोबतच जलसंवर्धन, देवराई, कातळशिल्प संवर्धनाविषयी मोलाचे मार्गदर्शन करत पर्यावरण आणि पर्यटन यांविषयी आपली भूमिका मांडली. डॉ. सुमेधा नाईक यांनी जुन्या झाडांसाठी पेन्शन योजनेची स्तुत्य कल्पना मांडली. ऍड. सुप्रिया लक्ष्मणराव यांनी पर्यावरणाबाबत जनजागृतीसाठी पर्यावरणविषयी कायद्यांविषयी माहिती असणे गरजेचे आहे, असे सुचविले. संजय रेंदाळकर यांनी या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा देत या उपक्रमात आपला सहभाग राहील, असे नमूद केले. भाग्यश्री परब यांनी ग्रामीण पातळीवर पर्यावरण जनजागृतीसाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष पाऊल उचलण्याची गरज असल्याचे नमूद केले. अनुभव शिक्षा केंद्राचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर आणि साद टीम कणकवलीचे अध्यक्ष श्रेयश शिंदे यांनी कोकणी रान माणूस प्रसाद गावडे यांच्या राखणदार फाउंडेशन आणि राष्ट्र सेवा दलामार्फत सादर करण्यात आलेल्या राखणदार पथनाट्याविषयी माहिती देत जनजागृतीसाठी लोकसंपर्क आवश्यक असल्याचे नमूद केले. या चर्चासत्रात सतीश लळीत सर, डॉ. सुमेधा नाईक, संजय रेंदाळकर, भाग्यश्री परब, अनुभव शिक्षा केंद्रचे कोल्हापूर जिल्हा प्रशिक्षक अशोक वरुटे, लातूर जिल्हा प्रशिक्षक महादेव कोटे, इकोमेट मालवण टीमच्या स्वाती पारकर, साद टीमच्या सदस्य नताशा हिंदळेकर, वृदाली हजारे यांच्यासह विविध क्षेत्रातील तीस हून अधिक मान्यवर सहभागी झाले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना सहदेव पाटकर यांनी मांडली तर आभार प्रदर्शन श्रेयश शिंदे यांनी केले.

error: Content is protected !!