सावंतवाडी (प्रतिनिधी) : बांदा-संकेश्वर महामार्गावरील सातोळी-बावळाट तिठा येथे जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाने पहाटेच्या सुमारास एक मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी बेकायदेशीरपणे गुरांची वाहतूक करणारे २ टेम्पो आणि ७० हजार रुपये किमतीची ७ गुरे जप्त केली असून याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित नारायण धवन (रा. न्हावेली), नागराज रामानना जन्न (रा. कर्नाटक), रामचंद्र नारायण सिंधी (रा. कर्नाटक) आणि प्रकाश बाळा कोरगावकर (रा. कुंभार्ली-मळगाव) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा वाहतूक शाखेचे पथक बांदा-संकेश्वर महामार्गावर गस्तीवर असताना, पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास सातोळी-बावळाट तिठा येथे संशयास्पद टेम्पो थांबवण्यात आले. या वाहनांची झडती घेतली असता, त्यात अत्यंत निघृणपणे ७ गुरांची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी ७० हजार रुपयांची गुरे आणि वाहतुकीसाठी वापरलेले ५ लाख रुपये किमतीचे टेम्पो असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जिल्हा वाहतूक शाखेच्या या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर गुरांची वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.












