रास्ता रोको आंदोलनाची दखल; बांधकाम सभापती रणजीत तावडे यांनी स्वखर्चाने बुजवले खड्डे

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे कोंडवाडी येथे शुक्रवारी दुपारी रिक्षा अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनाची तातडीने दखल घेत वैभववाडी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती रणजीत तावडे यांनी स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याची डागडुजी केली.

वाभवे नगरपंचायतीच्या हद्दीतील वैभववाडी–नावळे मार्गावरील कोंडवाडी परिसरात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. नागरिकांनी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार होती. शुक्रवारी दुपारी सांगुळवाडी येथील एक रिक्षा प्रवासी घेऊन वैभववाडीकडे येत असताना कोंडवाडी येथील वळणावर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने रिक्षा पलटी झाली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वाभवे, सांगुळवाडी आणि नावळे परिसरातील ग्रामस्थांनी संतप्त होऊन रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे सुमारे तासभर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी नगरपंचायतीचे पदाधिकारी तसेच पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आश्वासन दिले होते.

या आश्वासनाची पूर्तता करत बांधकाम सभापती रणजीत तावडे यांनी शुक्रवारी मध्यरात्री स्वखर्चाने कोंडवाडी येथील रस्त्यावर पडलेले खड्डे सिमेंट काँक्रीटच्या साहाय्याने बुजवून रस्त्याची डागडुजी केली. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवून तातडीने उपाययोजना केल्याबद्दल या मार्गावरील वाहनचालक, प्रवासी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत रणजीत तावडे यांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!