वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकण बोर्ड राज्यात प्रथम असून या बोर्डात सिंधुदुर्ग जिल्हा हा अव्वल स्थानी आहे तर जिल्ह्यात वैभववाडी तालुका शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल आहे मात्र दहावीच्या भुईबावडा परीक्षा केंद्रावर झालेल्या कॉपी प्रकरणामुळे वैभववाडी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याची बदनामी झाली आहे त्यामुळे या कॉपी प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी. असा ठराव सभापती सिद्धेश रावराणे यांनी मांडला त्याला सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले आहे. वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपसभापती साची कोलते, सदस्या सुवर्णा संसारे, साधना नकाशे, देवानंद पालांडे, मंगेश लोके, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. भुईबावडा कॉपी प्रकरणातील २४ जणांवर कारवाईचे आदेश कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले आहेत. असे वृत्त आज वर्तमानपत्रात छापून आले आहे. याबाबत सभापती सिद्धेश रावराणे यांनी गटशिक्षणाधिकारी थोरात यांना आपल्याकडे या प्रकरणाची काही माहिती आली आहे का अशी विचारणा केली असता अद्याप शिक्षण विभागाकडे बोर्डाकडून कोणतीही माहिती आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कॉपी प्रकरणामुळे वैभववाडी तालुक्याची बदनामी झाली आहे. त्यामुळे माहिती घेऊन संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक करावी झाली पाहिजे. असा ठराव सभापती रावराणे यांनी मांडला. त्याला सर्व सदस्यांनी एकमुखी पाठींबा दिला आहे. तर कॉपी प्रकरणामुळे वैभववाडी तालुक्याची बदनामी झाले आहे. हा बदनामी चा डाग पुसून टाकायचा असेल तर आपल्याला जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. पुन्हा एकदा जिल्ह्यात वैभववाडी तालुका हा गुणवत्तेत अव्वल राहिला पाहिजे. यासाठी प्रशासन म्हणून तुम्ही काम करा तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य पदाधिकारी म्हणून आम्ही करायला तयार आहोत. असा विश्वास देवानंद पालांडे यांनी शिक्षण विभागाला दिला. तर गेल्या दोन तीन वर्षात वैभववाडी तालुक्याला शिक्षण विभागामध्ये सक्षम अधिकारी नसल्यामुळे शिक्षण विभागाचा कारभार हा काहीसा मंद गतीने सुरू होता. आता गटशिक्षणाधिकारी म्हणून श्री थोरात यांनी कारभार स्वीकारला असून शिक्षण विभागात आलेली मरगळ झटकून शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. अशी सूचना मंगेश लोके यांनी केले. तर संचमान्यतेच्या नावाखाली विद्यार्थ्यांची होणारी फरपट थांबली पाहिजे. यापुढे अशा प्रकारे शिक्षक वाचविण्यासाठी विद्यार्थी इकडून तिकडे, तिकडून इकडे घेतल्याचे निदर्शनास आल्यास आम्ही गप्प बसणार नाही. असा इशारा पंचायत समिती सदस्य सुवर्णा संसारे यांनी दिला आहे. वैभववाडी तालुक्यात मोठया प्रमाणात गट स्थापन करण्यात आले आहे. या बचत गटांना उद्योग धंद्यासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातो. असे असताना बचत गटाच्या माध्यमातून झालेले कोणतेही उत्पादन बाजारपेठत का दिसत नाही? असा प्रश्न पालांडे यांनी केला. तर शासनाकडून निधी दिला जातो मात्र त्याचे योग्य नियोजन होतांना दिसत नाही. बचत गटांना कर्ज दिल्यानंतर त्याचा विनियोग योग्य पद्धतीने सुरु आहे काय पाहणे ही जबाबदारी कोणाची आहे. फक्त पापड लोणचे हे पारंपरिक उदयोग दाखवून चालणार नाही. असे पालांडे यांनी सुनावले. तर शासनाचा उद्देश यातून सफल झाला पाहिजे. यासाठी उमेद विभागाकडून योग्य नियोजन व देखरेख होणे गरजचे आल्याची सूचना सभापती रावराणे यांनी केली. तालुक्यातील वैभववाडी ते उंबर्डे दरम्यान रस्त्यावर खड्डे पडले आहेत. ते बुजवण्यात यावेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आलेले जोड रस्ते या रस्त्यावर पाणी मारले नसल्यामुळे उन्हाने सिमेंट उडून जात आहे. याकडे त्यांनी लक्ष दयावे. वैभववाडी तालुका हा ग्रामीण भागात मोडतो. तालुक्यात शववाहिनी नसल्यामुळे तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होतं आहे. यासाठी तालुक्याला शववाहीनी उपलब्ध करून दयावी अशी मागणी मंगेश लोके यांनी केली आहे तसेच वैभववाडी सडूरे मार्गांवर खड्डे पडले आहेत. याकडे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंता पुरी यांचे सभापती रावराणे यांनी लक्ष वेधले असता, रस्त्याचा जोखीम कालावधीत संपला असून नवीन खड्डे भरण्याच्या कामात हे काम घेता येत नसल्याचे सांगितले. तर पाच वर्षाचा जोखीम कालावधी संपल्यावर पुढची पाच वर्षे या रस्त्यावर काम कोणी करायचे. असा प्रश्न उपस्थित केला. तर किमान खड्डे तरी भरा अशी सूचना सभापती रावराणे यांनी केली. कोणतेही विकास काम झाल्यानंतर ते विकास काम कोणत्या योजनेतून झाले आहे. ते कोणी केले आहे. त्यावर झालेला एकूण खर्च हे सर्व दर्शवणारे बोर्ड त्याठिकाणी लावले पाहिजेत. तशी तरतूद केली पाहिजे. जोपर्यंत बोर्ड लावला जात नाही तोपर्यंत ठेकेदाराचे बिल आदा करू नये अशी सूचना देवानंद पालांडे यांनी केली. त्याला सभापती रावराणे, मंगेश लोके यांनी दुजोरा दिला. तर त्या बॉर्डवर जिल्याचे पालकमंत्र्यांचे नाव सुद्धा असले पाहिजे. अशी सूचना त्यांनी केली. चौकट.. वैभववाडी तालुक्यातील शिक्षकांचे केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सर्व केंद्र प्रमुखांचे पंचायत समितीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे कृषी विस्तार अधिकारी प्रवीण कुडतडकर यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले..
भुईबावडा कॉपी प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पंचायत समिती सभेत एकमुखी ठराव










