खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण – नडगिवे या गावचे सुपुत्र सुभाष पाटील यांच्या सामाजिक व पक्षीय संघटन कार्याची दखल घेऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या वतीने नुकतीच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी पुन्हा एकदा फेर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक अभिनंदन केले जात आहे.
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या शुभहस्ते सुभाष पाटील यांना उपाध्यक्षपदी निवडीचे लेखी पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सुभाष पाटील हे पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रमुख शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्षात सक्रिय असून पक्ष जे काम व जबाबदारी देईल ते प्रामाणिकपणे पार पाडत आले आहेत. राजकीय कामकाजा बरोबरच सामजिक कार्यात देखील सुभाष पाटील हे पुढे असून विविध सामजिक मंडळे व संस्थांमध्ये ते कार्य करत आहेत. पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई उपाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.













