खारेपाटण (प्रतिनिधी) : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या शास्त्रीय गायन, वादन परीक्षांचा मे २०२६ या सत्राचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये आदर्श संगीत विद्यालय, कणकवली यांचा शंभर टक्के निकाल लागला असून या संगीत विद्यालयाचे चार विद्यार्थी संगीत विशारद पूर्ण ही पदवी परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. कणकवली येथील आदर्श संगीत विद्यालयासाठी ही एक अतिशय गौरवास्पद गोष्ट असून आत्तापर्यंत या विद्यालयाचे १५ विद्यार्थी विविध विषयांमध्ये संगीत विशारद झाले असून संगीत क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे कार्य करत आहेत. तर संगीत विशारद ही पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे… – नेहा दीक्षांत देशपांडे, मीनल पांडुरंग केळुसकर, मृणाल मिलिंद गावकर (सर्व गायन) आणि श्रीधर किसन पाचंगे (हार्मोनियम) या विद्यार्थ्यांनी संगीत विशारद ही मानाची पदवी प्राप्त करून विद्यालयाच्या लौकिकामध्ये भर घातली आहे. तसेच, प्रारंभिक ते विशारद पूर्ण पर्यंतच्या परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारचे यश मिळवून गेल्या २२ वर्षातील शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या संचालिका संगीत अलंकार तेजस्विता संदिप पेंडुरकर आणि संगीत अलंकार संदिप पेंडुरकर यांचे मार्गदर्शन लाभले. या दैदीप्यमान यशाबद्दल कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गुरुवर्य बाळ नाडकर्णी, विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, प्रा. हरिभाऊ भिसे, शास्त्रीय गायक मनोज मेस्त्री, गंधर्व परिवार तसेच, कणकवलीतील विविध सांगितिक, शैक्षणिक संस्था आणि संगीत रसिकांकडून सर्व विद्यार्थी आणि संचालक यांचे अभिनंदन करण्यात आले.














