श्रीराम शेतकरी गट, घोणसरी कृषी विभागामार्फत भात पीक शेतीशाळा द्वारे श्रीराम शेतकरी गटाला मार्गदर्शन !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : सध्या पावसाचे प्रमाण कमी असतानाही उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून श्रीराम शेतकरी गटातील सदस्य श्री पद्धत भात शेतीच्या पुनर्लागवडीसाठी उत्साहाने शेतात उतरले. लावणीदरम्यान पारंपरिक गाण्यांच्या तालावर वातावरण भारावून गेले. विशेष म्हणजे, या गटाने पडीक असलेले क्षेत्र शेतीसाठी निवडले आहे.
लागवडीनंतर कृषी विभाग आयोजित शेतीशाळा कार्यक्रमात चिकट सापळे, कामगंध सापळे, गोकृपा अमृतम चा वापर तसेच खेळाच्या माध्यमातून मित्रकीटक व शत्रूकीटकांची ओळख अशा विविध विषयांवर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. यावेळी गटातील सदस्यांनी टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून स्वतः चिकट सापळे व कामगंध सापळे तयार केले. शेतात प्रत्यक्ष उपस्थित राहून पुनर्लागवड व मार्गदर्शन करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रवीण ओहोळ, मंडळ कृषी अधिकारी दूर्वा झुलपे, जि. प सदस्य राजन चिके, पं. स.सदस्य मानसी मराठे,घोणसरी उपसरपंच अंकिता परब ग्रामपंचायत सदस्य दीप्ती कारेकर उपकृषी अधिकारी साै.वेर्लेकर, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीम.हुले तसेच पानी फाउंडेशन फील्ड टीम उपस्थित होती.












