गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर तातडीने घटनास्थळावरून फरार
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता सुरज साखरे जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आर्थिक वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरात दिवसा ही गोळीबाराची घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव सुरज साखरे असून तो भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सुरज साखरे खासगी सावकार म्हणूनही काम करत असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधित वादातून त्याच्याच गटातील काही व्यक्तींनी हा गोळीबार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर तातडीने घटनास्थळावरून फरार झाले. अद्याप त्यांची ओळख पटलेली नसून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कामाला लागली आहेत. जखमी सुरज साखरे याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून गोळीबारामागील नेमके कारण, आरोपींची ओळख आणि संपूर्ण घटनेचा तपशील उघड करण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.












