सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला शिक्षक भारती सिंधुदुर्गचा जाहीर पाठिंबा
कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आवाज उठवत शिक्षण व्यवस्थेत सुधारणा, परीक्षांमधील गैरव्यवहारांवर कठोर कारवाई तसेच संबंधितांनी जबाबदारी स्वीकारावी, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी २८ जून २०२६ पासून नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला शिक्षक भारती सिंधुदुर्गतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला. या पार्श्वभूमीवर कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले.
उपोषणात शिक्षक भारतीचे राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ते नितीन वाळके, विनायक सापळे, नितीन तळेकर, नामानंद मोडक,रोहन कदम,राजेंद्र कदम, अनुभव साथी सहदेव पाटकर, फिजा मकानदार, राहुल कांबळे, श्रुती पाटणकर, बुशरा बागवान, सिद्धी परब, राहुल कदम, राहुल जाधव, मंगल डिसोजा, विभावरी कदम, प्राजक्ता नेमळेकर, स्वाती तेली, प्रियांका तांबे, दीप्ती कदम, नितांत चव्हाण आदी सहभागी झाले होते.
दिवसभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्था, सामाजिक उत्तरदायित्व आणि लोकजागृती याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आणि २० रोजी आयोजित करण्यात आलेल्या संसद मोर्चाला व्यापक पाठिंबा देण्याचे आवाहन उपस्थितांनी केले.
दरम्यान, उपोषणस्थळी माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, लोकेश कांबळे, जयू धुमाळे, राजेंद्र मुंबरकर, आशिष पेडणेकर, राजेंद्र कदम, नाट्यकर्मी प्रसाद घाणेकर आदींनी भेट देऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा दर्शविला.












