बँक ऑफ महाराष्ट च्या एटीएम मध्ये अज्ञातकडून महिलेला 9 हजारांचा गंडा

हातचलाखी करून दुसऱ्याचे एटीएम दिले महिलेच्या ताब्यात

महिलेची पोलीस ठाण्यात धाव, अद्याप गुन्हा दाखल नाही

कणकवली (प्रतिनिधी) : बँकेच्या एटीएम मशीनमध्ये हातचलाखी करत एटीएम कार्ड ची अदलाबदल करून अज्ञात आरोपीने महिलेला 9 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना कणकवली शहरात गुरुवार 16 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत संबंधित महिलेने कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करून घडलेली हकीकत अर्जात नमूद केली आहे. मात्र या घटनेबाबत कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक माहिती अशी की आशिये रोडनजीक राहणारी संबंधित महिला कणकवली शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या बाजूला असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र च्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेली होती. एटीएम मधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असताना महिलेला एटीएम मधून पैसे येत नव्हते. त्यावेळी मागून अज्ञात पुरुष एटीएम कडे आला. महिलेच्या हातातील एटीएम घेऊन मशीन मध्ये ऑपरेट केले. परंतु त्यावेळीही पैसे आले नाही. नंतर तो अज्ञात पुरुष एटीएम महिलेला देऊन निघून गेला. दरम्यान महिलेला मोबाईलवर एटीएम मधून पैसे काढल्याचा मेसेज आला. तात्काळ त्या महिलेने आपले बँक खाते असलेल्या कणकवली शहरातील स्टेट बँकेत जाऊन चौकशी केली. तेव्हा खात्यातून 9 हजारांची रक्कम गायब झाल्याचे दिसून आले.त्यांनंतर संबंधित महिलेने कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराबाबत लेखी तक्रार अर्ज सादर केला. या घटनेबाबत गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

error: Content is protected !!