तरंदळेत ओम साई महिला शेतकरी गटाचा नैसर्गिक भात लावणी उपक्रम उत्साहात

 महिलांनी घडवला स्वावलंबनाचा आदर्श

कणकवली (प्रतिनिधी) : ओम साई महिला शेतकरी गट, तरंदळे यांच्या वतीने सामूहिक भात लावणीचा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमातून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा प्रभावी संदेश देत महिलांनी एकजुटीच्या बळावर स्वावलंबनाचा आदर्श घालून दिला.

उपक्रमादरम्यान सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जीवामृत, दशपर्णी अर्क आणि गोकृपा अमृत यांसारखी नैसर्गिक द्रव्ये तयार करून त्यांचा शेतीत वापर करण्यात आला. तसेच लावणीपूर्वी चिखल करताना हिरवळीचे खत म्हणून गिरीपुष्पाच्या पाल्याचा वापर करण्यात आला. यामुळे नैसर्गिक शेतीची जाणीव व पर्यावरणपूरक शेतीची भावना शेतकऱ्यांमध्ये अधिक दृढ झाली. नैसर्गिक खत व अर्क तयार करण्यासाठी फोंडा येथील कृषी सहाय्यक अक्षया सावंत (परब) यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.

शेतीतील रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा व तणनाशकांचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने मिश्र पीक पद्धती, चिकट सापळे, पक्षी थांबे आदी पर्यावरणपूरक उपाययोजनांचाही अवलंब करण्यात आला. वाढती मजुरी व मजुरांची कमतरता लक्षात घेऊन महिलांनी एकत्र येत शेतीची कामे पूर्ण केली. त्यामुळे शेतीचा खर्चही लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे महिला गटाच्या सदस्यांनी सांगितले.

यावेळी ओम साई महिला शेतकरी गटासोबत जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांसाठी ‘बांधावरील शाळा’ हा उपक्रमही राबविण्यात आला. मुख्याध्यापक श्री. डोईफोडे तसेच शिक्षिका जयश्री वायभट व सोनाली वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात नेऊन शेतकऱ्यांची मेहनत, शेतीची कामे आणि कृषी संस्कृतीची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे शिक्षकांनी सांगितले.

उपक्रमाला गावचे सरपंच सुशील कदम, देवा रावळे, प्रभाकर कदम, मनीष पेडणेकर, शुभम कुरुंदवाडकर, तेजस सावंत आदींनी भेट देऊन महिलांचे कौतुक केले. तसेच भरणीचे सरपंच अनिल बागवे व माईनचे सरपंच यांनीही आपल्या गावात अशा प्रकारच्या सामूहिक शेती उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची ग्वाही दिली.

शेतीसाठी सहकार्य करणारे रमाकांत देवलकर, अरविंद घाडीगावकर, बमा सावंत, चिकू सावंत, दीप सावंत, अक्षय राणे, ओमकार सावंत, साहिल सावंत, अवि खरात, विजय गावकर, केशव सावंत, अमित सावंत, प्रमोद सावंत आदींचे आभार माजी सरपंच व बचत गटाच्या सदस्या नम्रता देवलकर यांनी मानले. भविष्यातही अशा विविध उपक्रमांद्वारे नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!