तळेरे (प्रतिनिधी) : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि इतर वैद्यकीय संघटनांनी दिनांक २० जुलै २०२६ रोजी राज्यव्यापी आरोग्य सेवा बंदची हाक दिली होती. या आंदोलनाला डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग यांनीही जाहीर पाठिंबा दिला होता.
आज सकाळी डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग यांच्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीत या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता.
दरम्यान, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून (Suo Motu) दखल घेत आरोपींचा जामीन स्थगित करून त्यांना आत्मसमर्पणाचे आदेश दिले. तसेच न्यायालयाने वैद्यकीय संघटनांना रुग्णहित लक्षात घेऊन प्रस्तावित आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले.
या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यव्यापी आरोग्य सेवा बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग यांनीदेखील आपल्या जाहीर केलेल्या बंदमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग यांच्या वतीने माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याची स्वतःहून दखल घेऊन सुट्टीच्या दिवशी विशेष सुनावणी घेत तातडीने कठोर आदेश देणे, तसेच रुग्णहिताला प्राधान्य देत वैद्यकीय संघटनांना आंदोलन स्थगित करण्याचे केलेले आवाहन ही न्यायव्यवस्थेची संवेदनशीलता, तत्परता आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबतची सकारात्मक भूमिका अधोरेखित करणारी बाब आहे. न्यायालयाच्या या निर्णायक हस्तक्षेपामुळे वैद्यकीय समाजाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी शासनानेही आवश्यक कायदेशीर सुधारणा व प्रभावी अंमलबजावणी तातडीने करावी, अशी अपेक्षा यानिमित्ताने डीएफसीचे जिल्हाध्यक्ष डॉ राजेंद्र पाताडे यांनी व्यक्त केली आहे.
डीएफसी सिंधुदुर्गचे मत स्पष्ट आहे की, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. महाराष्ट्र आरोग्य सेवा संरक्षण कायदा अधिक प्रभावी, कठोर व अजामीनपात्र तरतुदींसह सक्षम करण्यात यावा, दोषींवर तातडीने कठोर कारवाई व्हावी आणि डॉक्टरांना सुरक्षित कार्यपरिसर मिळावा, या मागण्यांसाठी डीएफसी ठामपणे पाठपुरावा करत राहील.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे आपल्या रुग्णसेवा सुरू ठेवाव्यात तसेच वैद्यकीय क्षेत्राच्या सुरक्षिततेसाठी आणि एकतेसाठी डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग यांच्या सोबत कायम उभे राहावे, असे आवाहन डॉ. राजेंद्र पाताडे-जिल्हाध्यक्ष,डॉ मिलिंद काळे- उपाध्यक्ष,डॉ. सुहास पावसकर- सचिव, डॉ. संदीप नाटेकर-खजिनदार डॉ सिद्धेश सकपाळ-सहसचिव डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.











