आरोग्य क्षेत्रात करिअर करण्याची विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
खारेपाटण (प्रतिनिधी) : आरोग्य क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या ग्रामीण व शहरी भागातील तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी रुग्ण सहाय्यक प्रशिक्षण अर्थात पेशंट असिस्टंट प्रोग्राम(Patient Assistant Program) या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला १ जुलै २०२६ पासून खारेपाटण ज्युनियर कॉलेज येथे सुरुवात झाली असून याचा बेरोजगार युवक युवतींना लाभ घ्यावा असे आवाहन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हा अभ्यासक्रम खारेपाटण येथील श्रीमती आशा राजाराम कावळे पॅरा नर्सिंग कॉलेज, खारेपाटण येथे राबविण्यात येणार असून याच्या प्रवेश अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. हा अभ्यासक्रम मुक्त विद्यापीठाशी संलग्न असल्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्रमाणपत्राला शासकीय तसेच खासगी आरोग्य संस्थांमध्ये विशेष महत्त्व प्राप्त आहे. अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णालयांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यामुळे त्यांना व्यावहारिक अनुभवासह रोजगारक्षम कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे.तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स,मल्टिस्पेशालिटी रुग्णालये तसेच विविध हेल्थकेअर संस्थांमध्ये ‘पेशंट असिस्टंट’ म्हणून रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा उपलब्ध असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी विलंब न करता अर्ज करावेत,असे आवाहन कॉलेज प्रशासनाने केले आहे. प्रवेशासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर कागदपत्रांची माहिती महाविद्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तरी प्रवेशा संदर्भात अधिक माहितीसाठी समन्वयक सारिका सचिन महिंद्रे (मो. 7588255742) तसेच कार्यालय लिपिक – श्रीमती गौरी विनायक सारंगे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य क्षेत्रात मानाचे, कौशल्याधारित आणि उज्ज्वल करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम निश्चितच एक महत्त्वाची संधी ठरणार असल्याचा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग आपल्या उज्वल भविष्यासाठी करावा असे आवाहन यावेळी संस्था अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.












