पीडितेला न्याय, आरोपीला कठोर शिक्षा द्या; हिंदू एकता मंचाची बांद्यात आक्रमक भूमिका
बांदा (प्रतिनिधी) : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू एकता मंच, बांदा यांच्या वतीने बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना अत्यंत धक्कादायक, संतापजनक आणि निषेधार्ह आहे. अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये तातडीने, निष्पक्ष व पारदर्शक तपास होणे अत्यावश्यक असून संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय कायद्यानुसार तसेच पॉक्सो (POCSO) कायद्यासह लागू असलेल्या सर्व संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पीडितेला न्याय मिळावा, तिची ओळख व गोपनीयता सुरक्षित राखण्यात यावी, तपासादरम्यान कोणत्याही प्रकारचा दबाव अथवा हस्तक्षेप होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दोष सिद्ध झाल्यास आरोपीला कायद्यानुसार कठोरातील कठोर शिक्षा व्हावी आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी हिंदू एकता मंच, बांदा व समस्त बांदावासीयांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी बोलताना हिंदू एकता मंचच्या पदाधिकाऱ्यांनी अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये कोणालाही पाठीशी घालू नये, दोषींवर त्वरित व कठोर कारवाई करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी भूमिका मांडली. हे निवेदन बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांना देण्यात आले. यावेळी हिंदू एकता मंच, बांदा यांचे निलेश सावंत, शैलेश केसरकर, गौरव महाजन, संदेश पटेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












