खारेपाटण हायस्कूल येथे “पाढ्यांची कार्यशाळा” संपन्न

“गणित हा माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक”- सदाशिव पांचाळ

खारेपाटण (प्रतीनिधी) : “गणित हा माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असून त्यात प्रगती करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रथम कर्तव्य आहे. आज सुमारे ७० टक्के विद्यार्थ्यांना पाढे पाठ नसल्याने त्यांचा गणितावरील आत्मविश्वास कमी होत आहे. गणितातील प्रगती ही यशाकडे जाणारे पहिले पाऊल आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव पांचाळ यांनी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शेट नविनचंद्र मफतलाल विद्यालयात विद्यार्थ्यांच्या पाढे विषयक आकलनाला गती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या “पाढ्यांची कार्यशाळा” या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.”

या पाढे विषयक कार्यशाळेला विद्यालयाचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, गणित विषयाच्या शिक्षिका आशा भोर तसेच इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेत सदाशिव पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना दोन,तीन आणि चार अंकी पाढे कॅल्क्युलेटरपेक्षा ही अधिक वेगाने कसे काढायचे, यासाठी सोप्या व प्रभावी गणिती क्लुप्त्या शिकवल्या. अवघ्या दीड तासाच्या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांनी या पद्धती आत्मसात करून कठीण वाटणारी गणिते काही सेकंदांत सोडविण्याची कला शिकली. पारंपरिक पद्धतीने पाच-पाच मिनिटे लागणारी गणिते सहज आणि वेगाने कशी सोडविता येतात, याची प्रात्यक्षिकेही त्यांनी यावेळी सादर केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य संजय सानप यांनी सदाशिव पांचाळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व आभार गणित विषयाच्या शिक्षिका आशा भोर यांनी मानले. सदाशिव पांचाळ हे गेल्या २३ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व मानसिक विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये त्यांनी विविध विषयांवरील १,८०० हून अधिक कार्यशाळा यशस्वीरित्या आयोजित करून हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयीची भीती कमी होऊन आत्मविश्वास आणि वेगवान गणिती कौशल्य विकसित होण्यास निश्चितच मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!