प्रताप भोसले यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांचे गौरवोद्गार

प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शालेय साहित्य वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : युवा उद्योजक प्रताप भोसले हे सामाजिक बांधिलकी जपणारे नेते आहेत. दरवर्षी वाढदिवसानिमित्त ते विविध सामाजिक उपक्रम घेत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यामंदिर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत आहोत. मी व प्रताप भोसले असे आम्ही दोघेही विद्यामंदिर हायस्कूलच्या मदतीसाठी सदैव धावून येऊ, अशी ग्वाही कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी दिली.

मराठा समाजाचे युवा नेते, प्रतिथयश उद्योजक प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शिवजयंती उत्सव समिती कणकवली व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या माध्यमातून येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यामंदीर हायस्कूलचे पर्यवेक्षक अच्युत वनवे, शिक्षक संदीप कदम, जनार्दन शेळके, पृथ्वीराज बर्डे, सत्यवान कदम, प्रताप भोसले यांचे सहकारी अजिंक्य लाड, सौ. साक्षी लाड, अमित पवार अभिजीत चव्हाण, रवी भंडारे, लक्ष्मण हन्नीफोड आदी उपस्थित होते.

सुशांत नाईक म्हणाले, प्रताप भोसले यांना मी महाविद्यालयीन जीवनापासून ओळखतो. भोसले हे उद्योजक आहेत. ते राजकीय क्षेत्रामध्ये नाहीत. तरीही त्यांनी सामाजिक बांधिलकी सदैव जपली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली कणकवली शहरातून शिवजयंती दिनी भव्य रॅली देखील निघते, अशी आठवण सुशांत नाईक यांनी करून दिली. शिवजयंतीदिनी प्रताप भोसले व त्यांचे मित्र मंडळ विविध आश्रमांना मदत करत असतात, याचाही नाईक यांनी आवर्जून उल्लेख केला.

अच्युत वनवे म्हणाले, प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या हायस्कूलला मदत करण्यात आली याबद्दल आम्ही आभारी आहोत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षक संदीप कदम यांनीही प्रताप भोसले यांचे सामाजिक कार्य विशद केले. अखेरीस अजिंक्य लाड यांनी आभार मानले.

error: Content is protected !!