कोटकामते येथे २४ जुलै रोजी जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती कार्यक्रम

कोटकामते (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन मंडळ, जळगाव तसेच जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी, सिंधुदुर्ग (PIMC) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री भगवती माध्यमिक विद्यालय, कोटकामतेच्या सभागृहात “जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रसार” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी, सिंधुदुर्ग (PIMC) चे प्रसारक विजय चौकेकर हे अंधश्रद्धा, जादूटोणा आणि तथाकथित चमत्कारांमागील वैज्ञानिक सत्य विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून उलगडून सांगणार आहेत.

यावेळी हातातून विभूती किंवा सोन्याची साखळी काढणे, पाण्याने दिवा पेटविणे, मंत्राने अग्नी प्रज्वलित करणे, नारळातून अग्नी पेटवून करणी काढणे, तांब्याच्या गठ्ठ्यात भूत उतरविणे, मंत्राने अगरबत्ती फिरविणे, जीभेतून तार आरपार काढणे, पेटता कापूर खाणे, तसेच हवेतून ताईत काढणे अशा विविध तथाकथित चमत्कारांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण प्रात्यक्षिकांसह दिले जाणार आहे. याशिवाय संतांच्या अभंग, गीते आणि कथांच्या माध्यमातून समाजप्रबोधनही करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम केवळ व्याख्यानापुरता मर्यादित नसून प्रात्यक्षिकाधारित आणि जनजागृतीपर असल्याने विद्यार्थ्यांचे पालक, नागरिक व परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री भगवती माध्यमिक विद्यालय, कोटकामतेचे प्रभारी मुख्याध्यापक यांनी केले आहे.

error: Content is protected !!