डिजिटल युगात सायबर सुरक्षिततेचे महत्त्व : कळसुली हायस्कूलमध्ये जनजागृती कार्यक्रम

कळसुली (प्रतिनिधी) : श्री दुर्गाराम नाईक इन्स्टिट्यूट, ओसरगाव, वेदांत कॉम्प्युटर आणि कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात पी.एस.आय रवींद्र पन्हाळे, पी.एस.आय पवन कांबळे, महिला पोलीस अस्मिता कारंडे, पोलीस श्रीकांत महामुनी तसेच दुर्गाराम नाईक इन्स्टिट्यूटचे संचालक प्रवीण नाईक वेदांत कॉम्प्युटरचे कणकवलीचे संचालक उदय मालप यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकामधून मुख्याध्यापक व्ही.व्ही वगरे यांनी सायबर सुरक्षितता ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता समाजामध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. सायबर सुरक्षितता विषयावर मार्गदर्शन वर्ग आयोजित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

पी.एस.आय रविंद्र पन्हाळे आणि पी.एस.आय पवन कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ओ.टी.पी, ए.टी.एम पिन, बँक खात्याची माहिती व पासवर्ड गोपनीय ठेवणे, मजबूत पासवर्ड वापरणे तसेच सायबर गुन्ह्यांची तक्रार कशी नोंदवावी याबाबत त्यांनी उपयुक्त माहिती दिली.

यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांचा शंकांचे निरसन केले. मान्यवरांनी प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक खबरदारी समजावून सांगितली. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित इंटरनेट वापर आणि डिजिटल जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली. दुर्गाराम नाईक इन्स्टिट्यूट चे संचालक प्रवीण नाईक यांनी संगणक ज्ञान यांचा सायबर सुरक्षितता यांचा सुरेख संगम कसा साधावा, सुरक्षा ॲप कसे वापरावे या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक व्ही.व्ही. वगरे पर्यवेक्षक सावळ एस. के, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

error: Content is protected !!