चक्रीवादळाच्या तडाख्यात रोणापाल येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

बांदा (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल गावाला चक्रीवादळाचा जबरदस्त फटका बसून अनेक शेतकऱ्यांच्या काजू, सागवान व इतर बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो झाडे उन्मळून पडल्याने अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज रोणापाल येथे भेट दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे, मंडळ कृषी अधिकारी युवराज भुईंबर, उपकृषी अधिकारी अजमुद्दीन सरगुरू, सहाय्यक कृषी अधिकारी वैभव ननवरे, आत्मा अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, संचालक सुरेश गावडे, प्रवीण परब, मंगला कामत, तसेच शेतकरी विष्णू महादेव सावंत, घासपर ऑगस्टीन मारणेकर, सदाशिव गाड आदी उपस्थित होते.

या दौऱ्यात शेतकरी विष्णू महादेव सावंत यांच्या काजू बागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. सेवानिवृत्त शिक्षक असलेल्या सावंत यांनी अनेक वर्षांच्या परिश्रमातून विकसित केलेली काजू बाग चक्रीवादळात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. गेल्या वर्षी त्यांच्या बागेतून सुमारे तीन टन काजू बियांचे उत्पादन झाले होते. मात्र यावर्षी वादळामुळे शेकडो काजूची झाडे उन्मळून पडून संपूर्ण बागायतीचे मोठे नुकसान झाले असून, क्षणात होत्याचे नव्हते झाले आहे. पाहणीदरम्यान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीची नोंद घेतली असून शासनाच्या नियमानुसार पंचनामे व मदत प्रक्रियेबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान, रोणापाल परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व बागायतींच्या पुनर्लागवडीसाठी विशेष सहाय्य देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

error: Content is protected !!