विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंतकणकवली खरेदी-विक्री संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात ; सभेत विविध विषयांवर झाली चर्चा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून सभासदांना न्याय देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. गेल्यावर्षी 22 विकास संस्थांना खत विक्री केली होती. मात्र, यावेळी लायसन्स नसलेल्या संस्थांना खत देता आले नाही, कारण खताच्या वाहनांना जीपीएस लावण्यात आले होते. इतर खते देखील उशिरा उत्पादन झाल्यामुळे उशिरा आली. तालुक्यात फक्त खत पुरवठा लायसन्स असलेल्या 3 संस्था आहेत. सांगावे आणि नांदगाव पॉज मशीन नाहीत. परंतु, संघात आलेल्या शेतकऱ्यांना आम्ही खते दिली. त्यामुळे खत विक्रीसाठी विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत असे आवाहन संघाचे चेअरमन प्रकाश सावंत यांनी केले.

कणकवली तालुका खरेदी-विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संघाच्या कार्यालयात पार पडली. या सभेत बॅंक संचालक विठ्ठल देसाई , कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन तुळशीदास रावराणे, संघाचे संचालक मिथिल सावंत, बबन हळदिवे , पंढरी वायंगणकर, संजय शिरसा, अतुल दळवी, किरण गांवकर, रघुनाथ राणे, प्रशांत सावंत, स्मिता पावस्कर, विनिता बुचडे, सोसायटी चेअरमन भगवान लोके, वसंत तेंडुलकर, सुनील गणपत सावंत, चंद्रहास मर्गज, अरविंद डेगवेकर, व्यवस्थापक धोंडी परब, माजी व्यवस्थापक प्रकाश घाडीगावकर, अनिल सुखटणकर , गणेश तावडे, राजेंद्र सावंत यांच्यासह तालुक्यातील विकास संस्थांचे चेअरमन व संघाचे सभासद उपस्थित होते. या सभेला कृषी उत्पन्न समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांची कृषी पणन संचालक पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देवून चेअरमन प्रकाश सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सभेत मागील आर्थिक वर्षाचा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक तसेच अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते, कृषी निविष्ठा तसेच आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. अहवालामध्ये विविध वर्गवारीत आर्थिक वर्षातील तरतूदीबाबत काही सभासदांनी विचारणा करत सुचना केल्या. त्यावर अध्यक्षांनी आपल्या सुचना अंमलात आणल्या जातील , असे सांगितले. यावेळी सभासदांनी विविध सूचना मांडत संघाच्या भविष्यातील वाटचालीबाबत आपली मते व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी संघाने अधिक व्यापक स्वरूपात काम करावे, अशी अपेक्षा सभासदांनी व्यक्त केली. या सभेत संघाला ऑडीट वर्ग अ मिळाल्याबद्दल असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी अभिनंदन ठराव मांडला. सभेच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!