नंदवाळ येथे होणार पायी दिंडी, रिंगण सोहळा
कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ येथे होणाऱ्या पायी दिंडी, रिंगण सोहळा आणि दर्शनासाठी जिल्हाभरातून हजारो भाविक दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर वाहतूक शाखेने शनिवारी (24 तारखेला) विशेष वाहतूक नियोजन जाहीर केले असून, राधानगरीमार्गे कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. ही वाहतूक व्यवस्था पहाटे 5 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत लागू राहणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोल्हापूर-राधानगरी मार्गावरील एसटी बस आणि अवजड वाहने कळंबा–इस्पुर्ली–शेळेवाडी–परिते फाटा–भोगावती या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत.तसेच रिंगण सोहळा पूर्ण होऊन दिंडी नंदवाळकडे रवाना होईपर्यंत कोल्हापूर-भोगावती मार्ग तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे.
रिंगण सोहळ्यादरम्यान वाहतुकीसाठी एकेरी मार्गाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूरहून राधानगरीकडे जाणारी वाहने हॉटेल रेडवुड येथून जिवबा नाना शेवट बसस्टॉप, पिरवाडी आणि तंदूर हॉटेलमार्गे पुढे जातील. तर राधानगरीकडून कोल्हापूरकडे येणारी वाहने संकल्पसिद्धी कार्यालयाजवळून फुलेवाडी रिंग रोडमार्गे वळवण्यात येतील. नंदवाळ गावाकडे जाणारे अनेक अंतर्गत रस्ते या काळात सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. वाशी-नंदवाळ फाटा, जैताळ फाटा, भीमाशंकर मंदिर फाटा तसेच तंदूर हॉटेल ते संकल्पसिद्धी मार्ग या परिसरात वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. भाविक आणि वाहनचालकांच्या सोयीसाठी खत कारखाना (वाशी), गिरगाव फाटा, चोरगे महाविद्यालय तसेच पुईखडी पाण्याच्या टाकीजवळ पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.मात्र अंबाजी खामकर गृहनिर्माण संस्था ते हॉटेल तंदूर कॉर्नर आणि वाशी पेट्रोल पंप ते खत कारखाना ओढ्यापर्यंतचा परिसर नो-पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे. आपत्कालीन सेवांसाठी नंदवाळ विठ्ठल मंदिर ते जैताळ फाटा हा मार्ग राखीव ठेवण्यात आला असून,नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य असे आवाहन करण्यात आले आहे.











