वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा शाखा डाकघरातील ठेव रकमेपैकी ६९ हजार ५४६ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन शाखा डाकपाल संतोष श्रीकृष्ण वारंगे याच्याविरुद्ध वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तळेरे येथील डाक निरीक्षक श्रीराम एस. वायाळ (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष वारंगे हा १० ऑगस्ट २०२४ ते ८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत भुईबावडा शाखा डाकघरात शाखा डाकपाल म्हणून कार्यरत होता. या काळात नागरिकांनी ठेव म्हणून जमा केलेल्या एकूण १ लाख ३७ हजार रुपयांपैकी ६९ हजार ५४६ रुपये त्याने स्वतःच्या खाजगी कामासाठी वापरून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे सरकारी रकमेचा अपहार केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर ८ नोव्हेंबर २०२४ रोजी संतोष वारंगे यांच्याकडील भुईबावडा शाखा डाकपालपदाचा कार्यभार काढून घेण्यात आला होता. त्यानंतर विभागीय कार्यालयामार्फत सविस्तर चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर १० जून २०२६ रोजी सिंधुदुर्गचे डाकघर अधीक्षक यांनी डाक निरीक्षक श्रीराम वायाळ यांना पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी वैभववाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून संतोष वारंगे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.












