ओटव घरफोडीचा एलसीबीकडून पर्दाफाश

सराईत चोरटा राजू सुतार गजाआड ; पोलीस कोठडीत रवानगी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्‍यातील ओटव येथील दोन घरे फोडून तब्‍बल ५३ हजार १०० रुपयांचा मुद्‍देमाल चोरणारा चोरटा राजू तुकाराम सुतार (३५, मूळ रा.नाधवडे, ता. वैभववाडी, सध्या रा. विरार पूर्व, जि. पालघर) याला स्‍थानिक गुन्‍हा अन्‍वेषण शाखेच्‍या एलसीबी पथकाने विरार येथूनच बुधवारी ५ ऑगस्ट रोजी राहत्या घरातून अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्‍या सूचनेनुसार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सनिल पाटील, सहाय्‍यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, हवालदार ज्ञानेश्वर तवटे व किरण देसाई यांनी केली.

ओटव मधील दोन्ही घरफोड्यांतील काही मुद्‍देमालही एलसीबी ने आरोपी राजू सुतारकडून हस्‍तगत केला असून ६ ऑगस्ट रोजी चोरट्याला कणकवली पोलिसांकडे सुपूर्द करण्‍यात आले आहे.दरम्यान कणकवली पोलीस ठाण्यातील या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पीएसआय पाटील यांनी आरोपी राजू सुतार याला कणकवली न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. १७ जूलै रोजी सकाळी ८.३० ते रात्री ११ वा. मुदतीत ओटव मध्ये घरफोडीची घटना घडली होत्‍या. चोरट्याने दिनेश शशिकांत कोरगांवकर व त्‍यांचे शेजारी नितेश रमेश देवळे यांच्‍या राहत्‍या घराच्‍या दर्शनी दरवाजाची कडी कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश करुन दोन मोबाईल, एटीएम कार्ड, रोख रक्कम, स्मार्ट वॉच व इतर कागदपत्र मिळून ५३ हजार १०० रुपयांचा मुद्‍देमाल चोरला होता. या गुन्‍ह्याचा समांतर तपास करताना सदर घरफोड्या राजू सुतार याने केल्‍याचे एलसीबी पथकाच्‍या तपासात निष्‍पन्‍न झाले. त्‍यानुसार पथकाने विरार गाठून त्‍याला अटक केली. राजू सुतार रेकॉर्डवरील आरोपी आहे. आरोपी राजू सुतार हा हिस्ट्री सीटर असून कोल्हापूर, वैभववाडी, सांगली जिल्ह्यात त्याच्यावर घरफोडी, चोर्‍यांचे गुन्हे दाखल आहेत.

error: Content is protected !!