सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ‘सीईओ’पदी अनिरुद्ध देसाई

रिझर्व्ह बँकेची मान्यता; २५ वर्षांचा सहकार व बँकिंग क्षेत्रातील अनुभव

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अनिरुद्ध यशवंत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीस रिझर्व्ह बँकेने ३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या आदेशान्वये अधिकृत मान्यता दिली आहे. त्यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार स्वीकारला आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

अनिरुद्ध देसाई हे सहकार व बँकिंग क्षेत्रातील २५ वर्षांहून अधिक अनुभव असलेले अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी २००४ ते २००८ आणि २०१० ते २०२२ या कालावधीत सांभाळली आहे. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी २०२२ ते २०२६ या कालावधीत सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात कोअर बँकिंगची १०० टक्के अंमलबजावणी, नेट एनपीए शून्य टक्क्यांवर आणणे, डिजिटल बँकिंगमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविणे, १२०० हून अधिक बचत गटांना कर्जपुरवठा, सहकारी संस्थांचे संगणकीकरण तसेच अवसायनातील संस्थांचे यशस्वी पुनरुज्जीवन यांसारखी कामे झाली.

यापूर्वी त्यांनी विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था या महत्त्वाच्या पदावरही काम केले आहे. सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण, पतपुरवठा धोरण, कोअर बँकिंगची अंमलबजावणी आणि ग्रामीण पतपुरवठा या विषयांतील त्यांचा अनुभव दांडगा आहे. अध्यक्ष म्हणून काम करताना मनीष दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गेल्या साडेचार वर्षांत मोठी प्रगती केली आहे. बँकेचा व्यवसाय ४४५७ कोटींवरून ७५३१ कोटी रुपयांवर, तर निव्वळ नफा १६ कोटींवरून ५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेला सलग ‘अ’ ऑडिट वर्ग तसेच राष्ट्रीय स्तरावरील सहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या प्रगतीच्या टप्प्यावर अनिरुद्ध देसाई यांच्या रूपाने बँकेला अनुभवी प्रशासकीय नेतृत्व लाभले आहे. डिजिटल बँकिंग, १०० टक्के वसुलीचे ध्येय, शेतकरी-केंद्रित पतधोरण आणि सहकारी संस्थांचे बळकटीकरण या आघाड्यांवर अध्यक्ष मनीष दळवी यांना त्यांची मोलाची साथ ठरणार आहे.

“अनिरुद्ध देसाई यांच्यासारखा अनुभवी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लाभणे ही बँकेसाठी जमेची बाजू आहे. पुणे जिल्हा बँकेतील त्यांची कामगिरी आम्ही पाहिली आहे. सिंधुदुर्गच्या सहकाराला आधुनिकतेची जोड देत राज्यात अव्वल बनविण्याच्या आमच्या ध्येयाला त्यांच्या अनुभवाची निश्चितच मदत होईल. रिझर्व्ह बँकेने नियुक्तीस मान्यता दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.”
मनीष दळवी, अध्यक्ष

‘एनपीए शून्यावर आणण्याला प्राधान्य’
नवनियुक्त सीईओ अनिरुद्ध देसाई म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची आजची वाटचाल प्रेरणादायी आहे. अध्यक्ष मनीष दळवी, संचालक मंडळ व सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बँकेला तंत्रज्ञान, पारदर्शकता व शेतकरी हिताच्या त्रिसूत्रीवर आणखी पुढे नेण्याचा माझा प्रयत्न राहील. १०० टक्के वसुली, एनपीए शून्यावर आणणे आणि प्रत्येक सभासदापर्यंत डिजिटल बँकिंग पोहोचविणे ही माझी प्राधान्ये असतील.” असे सांगितले.

पूर्वीही सांभाळली होती जबाबदारी
अनिरुद्ध यशवंत देसाई हे यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर कार्यरत होते. त्यांच्यानंतर हे पद रिक्त झाल्याने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. आता पुनश्च श्री.देसाई यांचीच मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पुढील वाटचालीत अनिरुद्ध देसाई यांचा प्रशासकीय अनुभव आणि अध्यक्ष मनीष दळवी यांचे नेतृत्व यांचा समन्वय बँकेला ‘सहकारातून समृद्धीकडे’ नेण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

error: Content is protected !!