सायबर प्रकरणातील आरोपीला सशर्त जामीन; विशेष न्यायालयाचा आदेश

अल्पवयीन मुलीशी संबंधित सायबर गुन्हा : आरोपीची ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामिनावर सुटका

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीशी संबंधित सायबर प्रकरणात दाखल गुन्ह्यातील आरोपीला विशेष न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि त्याच रकमेच्या एका जामीनदाराच्या अटीवर सशर्त जामीन मंजूर केला. विशेष न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी यांनी हा आदेश दिला. आरोपीच्या वतीने अॅड. सौरव संग्राम देसाई यांनी बाजू मांडली. सिंधुदुर्ग सायबर पोलिस ठाण्यात या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(ई), ६७(ब), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमातील कलम १२ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयाने आरोपीला सात दिवस सायबर पोलिस ठाण्यात दररोज सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हजेरी लावण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच प्रकरणाशी संबंधित व्यक्तींना कोणतेही प्रलोभन, धमकी किंवा दबाव देऊ नये, पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करू नये आणि पीडित अल्पवयीन मुलीशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये, अशी अट घालण्यात आली आहे. आरोपीने अशाच स्वरूपाचा गुन्हा पुन्हा करू नये, स्वतःचा पत्ता व संपर्क क्रमांक तसेच दोन नातेवाइकांचे संपर्क क्रमांक तपास अधिकाऱ्याला द्यावेत, पत्त्यात बदल झाल्यास पोलिसांना कळवावे, अशा अटीही न्यायालयाने घातल्या आहेत.

error: Content is protected !!